Harshwardhan Sapkal Sarkarnama
विदर्भ

Buldhana Sindkhedraja: जिजाऊंच्या मातृतीर्थात अंधार; राहुल गांधींच्या निकटवर्तीयांचा पारा चढला

Ganesh Thombare

Buldhana News : संपूर्ण देशाचे दैवत असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे बुलडाणा जिल्ह्यातील आजोळ गेल्या २० दिवसांपासून अंधारात आहे. येथील वीजपुरवठा आणि सीसीटीव्ही यंत्रणा खंडित झाला आहे. या प्रकारामुळे काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या ‘यंग ब्रिगेड’मधील माजी आमदार चांगलेच संतापले असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘आम्हीच काय ते बघून घेतो..’, असा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात लढवय्या मराठ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले सिंदखेडराजा येथील मातृतीर्थ अंधारात बुडाले आहे. राजमाता जिजाऊ यांचा ज्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात जन्म झाला, ते जन्मस्थळ काळोखाने माखले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या २० दिवसांपासून राजवाड्यात वीजपुरवठा नाही व येथील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद झाली आहे, पण याकडे कुणाचेच लक्ष नसल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा चांगलाच पारा चढला. ‘मराठ्यांना आरक्षणासाठी तर सतावत आहात, पण जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थळ तर अंधारात बुडवू नका..’ अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत तत्काळ वीजपुरवठा व सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे मातृतीर्थ गेल्या २० दिवसांपासून अंधारात आहे, ही बाब कुणाच्याच लक्षात कशी आली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विकास करण्यासाठी शासनाने मोठा निधी मंजूर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं, जगदंबा तलवार परत आणण्यासाठी शासन आटापिटा करीत आहे. मात्र, शिवरायांना घडविण्यात व त्यांचा पराक्रम तळपत्या तेजस्वी सूर्यासारखा करण्यात ज्या जिजाऊंचा मोठा वाटा होता, त्यांच्याच जन्मस्थळाचा वीजपुरवठा खंडित केल्या जातो, याला काय म्हणावे, असा प्रश्न शिवभक्त व जिजाऊप्रेमी उपस्थित करत आहेत.

जिजाऊंच्या राजवाड्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात मराठा समाजासह संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व मराठा महासंघाचे मोठे प्राबल्य आहे. अशात प्रशासनाने दिरंगाई केल्यास त्यांना या संघटनांसह शिवप्रेमी व जिजाऊभक्तांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बुलडाणा जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT