Badnapur News: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, सत्ताधाऱ्यांना आरक्षण समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने 'मेरी माटी मेरा देश, अमृत कलश यात्रा' आणि 'यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल लाभार्थी मेळावा' आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे उपस्थित होते. मात्र, हा कार्यक्रम सुरू असतानाच दहा ते पंधरा मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. भर कार्यक्रमात घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ उडाला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत आत्महत्या केली. ही घटना अवघ्या मराठा समाजाला व त्यांच्या कुटुंबीयांना व्यथित करणारी आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाने हा कार्यक्रम का घेतला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मराठा आरक्षणाबाबत आपली असंवेदनशीलता दाखवली आहे, त्यामुळे आम्ही प्रशासन आणि पुढाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बदनापूर तालुक्यात कुठलाही शासकीय आणि राजकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडली.
"आरक्षण आमच्या हक्काचे...","मनोज जरांगे पाटील आगे बढो...", "मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना न्याय द्या..", या घोषणेसह केंद्रीय मंत्री दानवे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी पोलिस आंदोलकांना कार्यक्रमस्थळी जाण्यापासून रोखत होते.
आंदोलक आणि पोलिसांत तब्बल अर्धा तास गोंधळ सुरू होता. अखेर पोलिस प्रशासनाने आंदोलकांना पंचायत समितीच्या बाहेर काढले. आंदोलकांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कार्यक्रम संपल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय नेत्यांविरुद्ध रोष निर्माण होत असून, अनेक गावांत गावबंदीचे फलक लावण्यात आले आहेत. आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्यांनी गावात प्रवेश करू नये, असे संदेश फलकावर लिहिण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, आता सरकार काय भूमिका घेते, ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.