Amol Mitkar. Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Melava : पतंग कापण्याचा प्रयत्न, पण अमोल मिटकरी म्हणाले थांबा ना बाप्पा!

Amol Mitkari : महायुतीच्या महामेळाव्यात भाषणादरम्यान घोषणाबाजी आणि हंशाही

सरकारनामा ब्युरो

सचिन देशपांडे

Akola Politics : अकोल्यात संक्रांतीला पतंग कापण्याचा आणि कटलेल्या पतंगीत आनंद लुटण्याचा मोठा उत्सव असतो. रविवार असल्याने सर्वत्र पतंगबाजी दिसत होती. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अकोला येथील जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात घोषणाबाजी करत मिटकरींच्या भाषणाची पतंग कापण्याचा प्रयत्न केला. पण समयसूचकता दाखवत मिटकरींनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.

भाजपच्या कार्यकर्त्यांना आमदार अमोल मिटकरी यांच्या पूर्वीच्या अनेक वक्तव्याचा त्रास होत असल्याची ओरड नेहमी होते. ते सोबत आल्याचा भाजपाच्या काही निष्ठावंतांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मग त्याचा वचपा आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाषणात व्यत्यय आणत काढण्याचा प्रयत्न केला. पण आमदार मिटकरींनी ‘थांबा ना बाप्पा’ म्हणत ही ‘पेचा’ टाळण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत कशी आली?, हे सांगण्याच्या प्रयत्नात असलेल्या आमदार अमोल मिटकरी यांना आज महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीचा काहीसा सामना करावा लागला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि जय श्रीरामाचे नारे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार मिटकरींच्या भाषणा दरम्यान लावले. ते उत्स्फूर्तपणे लावले गेले की लावण्यात आले?, हा शोधाचा विषय असू शकतो.

महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस का आली याचा रोष कार्यकर्त्यांमध्ये होता की आमदार मिटकरींच्या भाषणाचा, असा प्रश्न येथे चर्चिला गेला. जय श्रीरामाचा गजर यावेळी कार्यकर्त्यांनी केला. एका उत्साही कार्यकर्त्याने थेट ‘सबका साथ सबका विकास’ हिच घोषणा देत सर्व परिसर दणाणून सोडला. त्यावर आमदार मिटकरींना ‘थांबा ना बाप्पा आता….सबका साथ सबका विकास आम्ही हाती घेतला आहे’, असे नमूद केले. त्यानंतर घोषणाबाजी करणारे कार्यकर्तेही शांत झालेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार मिटकरी यांनी ‘इंडिया’ आघाडी बुडते जहाज असल्याचे सांगत ‘इंडिया’ आघाडीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार हे बुडत्या जहाजात असल्याचे अप्रत्यक्ष पणे सांगून टाकले. पुलोद सरकारचा विषय काढत अजित पवारांचे बंड योग्य ठरविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे अजित पवार हे वाहत्या झऱ्यातील राजहंस असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. ‘सध्यातरी’ या शब्दावर जोर देत आमदार मिटकरी यांनी देशात मोदींचे नेतृत्व मान्य केले.

बापाचा आणि काकाचा पक्षचोर अशी टीका संजय राऊत यांनी केल्यानंतर राऊत यांच्यावर आमदार मिटकरी यांनी पलटवार केला. माणसाच्या दहा इंद्रियांपैकी संजय राऊत यांचे तीन इंद्रिये निकामी झाल्याचा आरोप त्यांनी केला. यात मेंदू, जीभ, डोळे निकामी झाल्याचे सांगत राऊतांचे मोतीबिंदुचे ऑपरेशन करण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मशाल यात्रेत 17 लोकांचा सहभागाची खिल्ली आमदार मिटकरी यांनी उडवली.

महायुतीच्या आजच्या अकोल्यातील जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात प्रविण दरेकर यांची उपस्थिती होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गेले तरी कुठे?, असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडला होता. महायुतीचा अकोल्यातील लोकसभेचा उमेदवार निश्चित नसला, तरी केंद्रस्थानी भाजपा आमदार रणधीर सावरकर होते. एका कोपऱ्यात खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र व लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे यांना बसविण्यात आले होते.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT