Sunil kedar Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar News : सुनील केदारांच्या शिक्षेला स्थगिती मिळू नये यासाठी सरकारतर्फे खास दिल्लीतून वकील?

Sunil Kedar and Nagpur High Court : न्यायालयाने अद्याप निर्णय दिला नसल्याने केदार समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Rajesh Charpe

Sunil Kedar Court Hearing News : माजी मंत्री सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती मिळू नये याकरिता राज्य शासनाच्यावतीने दिल्लीतून विशेष सरकारी वकिलास सुनावणीसाठी नागपूरमध्ये आणले गेल्याचे समोर आले.

गुरुवारी ॲड. सिद्धार्थ दवे यांनी सरकारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बाजू मांडली. दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. न्यायालयाने अद्याप निर्णय दिला नसल्याने केदार समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सुनील केदारांचे(Sunil Kedar) राजकीय भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यास केदारांना पुन्हा विधानसभेचे सदस्यत्व परत मिळेल आणि पुढील विधानसभेची निवडणूकसुद्धा लढता येणार आहे. नागपूर मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यात केदारांना कनिष्ठ न्यायायलयाने दोषी ठरवले. त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या ते जामिनावर आहेत.

ॲड. दवे यांनी केदारांना दिलासा दिल्यास ते आगामी निवडणूक लढू शकतात. कदाचित ते निवडूनही येतील. मात्र, त्यांनी या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. यात त्यांना दिलासा मिळाला नाही तर पुन्हा त्यांचे सदस्यत्व रद्द होईल. नंतर मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल.

या निवडणुकीसाठी जनतेचाच पैसा खर्च होईल. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देताना अशा प्रकरणांमध्ये शिक्षेला स्थगिती देणे हा अपवाद आहे. ती दिलीच जावी असा नियम नाही, असा युक्तिवाद सिद्धांत दवे यांनी केला आहे.

तत्पूर्वी, सुनील केदार यांच्यातर्फे वरिष्ठ विधिज्ञ एस. के. मिश्रा यांनी बाजू मांडली. दोषी ठरलेल्या देशातील अन्य आमदार, खासदारांचे त्यांनी दाखले दिले. यामध्ये, राहूल गांधी, रमा नारंग, अफजल अन्सारी व नवज्योतसिंग सिद्धू अशा काही लोकप्रतिनिधींचा समावेश होता.

स्थगिती हा अपवाद आहे, हे मान्य असले तरीसुद्धा केदारांना दिलासा नाकारल्यास लोकप्रतिनिधीला या प्रकारचा दिलासा नाकारला गेल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण असू शकते, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुमारे अडीच तास चाललेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांची बाजू मांडून पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT