Chandrakant Patil With Sumit Wankhede at Wardha. Sarkarnama
विदर्भ

Wardha News : मंत्री चंद्रकांत पाटील कुणाला म्हणाले, हा पठ्ठ्या कामांबाबत वाघ

Atul Mehere

Chandrakant Patil : भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचे नेहमी भरभरून कौतुक करीत शाबासकी देतात. विशेषतः जाहीर कार्यक्रमात तर दादा दिलखुलास बोलून साऱ्यांची मने जिंकतात. वर्धा येथील भाजपच्या दिवाळी मिलन कार्यक्रमातही त्यांनी आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कामांची स्टाइल उघडपणे मांडली. ‘हा पठ्ठ्या म्हणजे कामाच्या बाबतीत वाघ आहे. लोकांची कामं कुणाकडून कशी करवून घ्यायची, हे त्याला चांगलंच ठाऊक आहे’, असे सांगत दादांनी सुमित वानखेडेंना वर्ध्यात येऊन बळ दिले. यानिमित्ताने सुमित यांना आर्वीसाठी दादांकडूनही ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे सुमित हे आर्वीतूनच विधानसभेत जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

दादांच्या बोलण्याचं निमित्त होतं भापजच्या वतीनं आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं. खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शोभा काळे आदी या वेळी उपस्थित होते. (State Minister Chandrakant Patil Praised BJP Leader Sumit Wankhede at Arvi of Wardha District)

वर्धा लोकसभा भाजप निवडणूक प्रमुख सुमित वानखडे यांनी आर्वी येथील रुणिक धाममध्ये भाजपच्या वतीनं दिवाळी स्नेहमिलन सोहळा घेतला. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्ते उपस्थितांना संबोधित केलं. पाटील यांनी वानखेडे यांची स्तुती केली. सुमित हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायकही आहेत. ‘अनेक वर्षे सुमितसोबत काम केले आहे. ज्या व्यक्तीला आपण जवळून ओळखतो अशा सुमितनं बोलावल्यावर नकार देणं शक्यच नव्हतं’, असं पाटील म्हणाले.

भाजपनं आयोजित केलेल्या स्नेहमिलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केवळ कार्यकर्त्यांपुरतीच हे स्नेहमिलन मर्यादित न ठेवता त्यात आर्वी शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम व्यापारी करीत आहेत. त्यामुळं त्यांना त्यांचा योग्य सन्मान समाजात मिळाला पाहिजे. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ही भाजपची शिकवण आहे. हे मूल्य वर्धा येथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते जपताहेत याबद्दल त्यांनी समाजात सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर्वीतील ज्येष्ठ नागरीक, व्यापाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वर्धा जिल्ह्यात भाजपची पाळंमुळं घट्ट रोवण्यासाठी सध्या सुमित वानखेडे हे दिवसरात्र प्रयत्न करताना या आयोजनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून आले. सध्या लोकसभा मतदारसंघावर भाजपचं प्रभुत्व आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांतील एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी अमरावतीच्या मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार, तर देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रणजित कांबळे हे आमदार आहेत. अमरावतीमधील धामवगाव रेल्वे, वर्धेतील आर्वी, हिंगणघाट, वर्धा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शतप्रतिशत भाजपची तयारी येथे सुरू आहे. त्याची जबाबदारी पक्षानं सुमित वानखेडे यांच्यावर सोपविली आहे.

Edited by : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT