Chandrapur BJP controversy; Ravindra Chavan, Kishor Jorgewar and Sudhir Mungantiwar sarkarnama
विदर्भ

BJP Politics : चंद्रपुरात अंतर्गत वाद..., सुधीर मुनगंटीवार यांचा संताप : थेट बड्या नेत्यावर फोडलं खापर, फडणवीसांकडेही दाखवलं बोट

Sudhir Mungantiwar Vs Kishor Jorgewar : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद वाढताना दिसत असून नगरसेवकांमधील वादाने तो आणखी चिघळला आहे.

Aslam Shanedivan

Chandrapur Political Row News : चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. तर नुकतेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीला स्थगिती देत मुनगंटीवार यांना धक्का देण्याचे काम केले आहे. त्यातच शुक्रवारी (ता. ३) महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द झाल्याच्या कारणावरून दोन्ही नेत्यांच्या समर्थक नगरसेवक एकमेकांना भिडले. यावेळी जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत राजकारणाला उत आल्याचे चित्र दिसत आहे.

यावरून मुनगंटीवार यांनी बोचरी प्रतिक्रिया देत, "मला जिल्ह्यातील अंतर्गत वादाबाबत काहीही माहिती नाही. आता चंद्रपूर जिल्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत," असे म्हटले आहे. यामुळे मुनगंटीवार आता आपल्या पक्षातील नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चंद्रपूर भाजपमधील मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या मतभेदांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून दोन्ही नेत्यांमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. दरम्यान, या संघर्षावर नियंत्रण मिळवणे किंवा तो सोडवणे आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही स्वतःची हतबलता व्यक्त केली आहे.

यावरून पत्रकारांनी मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी खोचक उत्तर देत, "मला जिल्ह्यातील अंतर्गत वादाची माहिती नाही. मला जिल्ह्यातील प्रश्नांवर कधीच मत व्यक्त करायचं नाही. सध्या चंद्रपूर जिल्हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत असून तेच आमची जिल्हा संघटना चालवत आहेत. यावर उत्तर तेच देऊ शकतील किंवा याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगू शकतील," असे उत्तर दिले.

याचवेळी त्यांनी उपरोधिक टोला लगावत, "फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पाठ म्हणत तुम्हाला बातमी पाहिजे असेल, पण मी आता प्रतिज्ञा घेतली असून मी बोलणार नाही. मात्र तुम्हाला माहिती हवीच असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतो. तुम्ही जा आणि माहिती घ्या," असेही मुनगंटीवार म्हणाले.

"मी संघटनेकडे लक्ष घालणार नसून लोकांचे प्रश्न, बेरोजगारी, पिण्याच्या पाण्याची समस्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत आहे. यासाठीच जनतेने मला अधिकार दिला असून पक्षाने मला तिकीट दिलं आणि जनतेने निवडून दिलं आहे. जिल्ह्याचे नेतृत्व आता रवींद्र चव्हाण करत आहेत. तेच संघटना चालवत आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, "प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रपूरच्या संघटनेचं त्यांनी 'कल्याण' करण्याचा निर्णय घेतला असेल. आता आपण फक्त वाट पाहिली पाहिजे. त्यांनी निर्णय घेतला असून तेच सर्व काही पाहतील. आता 'कल्याण' शब्दाचा अर्थ कसा आणि काय घ्यायचा, तो तुम्ही घ्या," असेही त्यांनी पत्रकारांना म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT