Nagpur News : सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांना चंद्रपूरचे बडे नेते म्हणून ओळखलं जात. मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे अर्थमंत्री होते तर अहीर मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात राज्यमंत्री होते. सध्या दोघांचेही दिवस फिरले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत असली तर दोन्ही नेते रिकामेच आहेत. त्यांच्याकडे कुठलीही मोठी जबाबदारी देण्यात आलेली नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीत बोलावले होते. त्यापूर्वी अहीर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांची भेट घेतली. त्यावरून आता वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. मुनगंटीवार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहभागी होतील तर अहीर यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
एकाच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत असताना अहीर आणि मुनगंटीवार यांच्यात कधीच सख्य नव्हते. पक्षाच्या शिस्तीमुळे ते एकमेकांच्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी बोलत नव्हते. मात्र, निवडणुकीच्या काळात त्यांचे समर्थक एकमेकांच्या तक्रारी करीत असत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहीर यांचा केंद्रीयमंत्री मंडळात समावेश करण्यात आला होता. स्वतंत्र कार्यभार असलेले खाण मंत्रालय त्यांना सोपवण्यात आले होते.
मंत्री झाल्यावर त्यांना आपला मतदारसंघ टिकवता आला नाही. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यावेळी मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातून मोठा फटका त्यांना बसला होता. याकडे लक्ष वेधून मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला जात होता. त्यामुळे मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात मुनगंटीवार वनमंत्री आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते. लोकसभेच्या निवडणुकीत हंसराज अहीर यांना डावलून मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले होते.
मात्र ते पराभूत झाले. मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मुनगंटीवार पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. एवढेच नव्हे तर चंद्रपूर जिल्हा संघटनेतूनही त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. पक्षात नव्यानेच दाखल झालेले आमदार किशोर जोरगेवार यांना जास्त महत्त्व दिले जात आहे. जिल्ह्यातील इतर नेतेही जोरगेवार यांच्यासोबत असताना दिसतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन दैऱ्यात मुनगंटीवार अनुपस्थित होते. या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे हंसराज अहीर यांची केंद्राने इतर मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. असे असले तरी आयोगाच्या अध्यक्षपदाला फार काही महत्त्व नाही. केवळ राजकीय सोय म्हणून बघितल्या जाते. दोघांच्या भांडणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा वरचढ होऊ लागल्याचे दिसत आहे. केंद्रीय नेत्यांच्या भेटगाठीने दोन्ही चंद्रपुरातील दोन्ही नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकली जाणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात मोठे फेरबदल केले जातील असाही दावा केला जात आहे.