Sudhir Mungantiwar and Ministership News : राज्याचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळून भाजपने त्यांना जोरदार धक्का दिला आहे. यातच त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी त्यांच्या गडकरी भेटीच्या टायमिंगने विविध तर्कवितर्क काढल्या जात आहे.
१९९५मध्ये सर्वप्रथम शिवसेना-भाजप(BJP) युतीची सत्ता आली तेव्हा मुनगंटीवार मंत्रिमंडळात होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पाच वर्षे युतीची सत्ता असताना महत्त्वाचे अर्थखाते त्यांच्याकडे होते. भाजपचे प्रदेशाध्यक्षसुद्धा होते. अडीच वर्षांच्या महायुतीच्या कार्यकाळत त्यांच्याकडून अर्थखाते काढून घेण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी ते आपल्याकडे घेतले होते. त्यांनीच महायुतीचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. मुनगंटीवार यांच्याकडे तुलनेत दुय्यम असलेले वनखाते सोपवण्यात आले. अजित पवार महायुतीच सहभागी झाल्यानंतर अर्थखाते त्यांना देण्यात आले होते.
दरम्यान मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांना लोकसभेची निवडणूक लढण्यास पक्षाने सांगितले होते. ते केंद्रात जातील अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे ते पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मोठ्या फरकाने ते निवडून आले.
महायुतीला बहुमत मिळाल्याने मुनगंटीवारांच्या नावाचा समावेश पहिल्या पाच खात्यात राहील असेच बोलले जात होते. त्यांचा अनुभव, निष्ठ आणि संघाशी असलेली जवळीक बघता त्यांना डावलल्या जाणार नाही असेच सर्वांना वाटत होते. मात्र भाजपने धक्कातंत्राचा वापर केला. चंद्रपूर जिल्ह्यातून कोणाचाच मत्रिमंडळात समावेश केला नाही.
मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये घेण्यात आला. मुनगंटीवार यांना तुम्ही मंत्री होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शथपविधीच्या वेळेपर्यंत त्यांना फोन आला नाही. राजभवनात येण्याचे निमंत्रणही देण्यात आले नाही. तेव्हाच त्यांचा पत्ता कट झाल्याचे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांची भेट घेतली. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात होते. गडकरी यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहो, पक्ष देईल ती जबाबदारी घेईल असे त्यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.