वाशीम : जिल्ह्यात तब्बल २८७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. तर उद्या मतदान (voting) पार पडणार आहे. ग्रामपंचायतीचा गुलाल कुणाचा? यासाठी उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी उमेदवारांसाठी रात्र वैऱ्याची असते असं म्हटलं जातं. याच सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील सज्जता ठेवली आहे. (Gram Panchayat Election)
जिल्ह्यातील एकूण ९ ग्रामपंचायती ह्या पुर्णत: बिनविरोध झाल्यामुळे आता जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी ४ हजार २३७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचांची (Sarpanch) निवड ही थेट जनतेतून होणार असून २८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज स्विकारण्यास प्रारंभ झाला होता. तर उमेदवारी माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले. आता वाशीम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, मानोरा कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये सदस्यत्वासाठी तब्बल ५ हजार ४४७ उमेदवार नशीब आजमावित आहेत.
जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी निवडणूक होत असून गावाचा कारभारी होण्यासाठी तब्बल १ हजार ४३९ उमेदवार निवडणूक मैदानात शड्ड ठोकून आहेत. निवडणुकीत नशीब आजमावित असलेल्या उमेदवारांचा राजकीय भविष्याचा फैसला जिल्ह्यातील ३ लाख ६८ हजार ४२१ मतदार करणार असून यामध्ये १ लाख ७९ हजार ९०० महिला, तर १ लाख ८९ हजार ५२० पुरुष मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण ८५४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविल्या जाणार असून यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक पोलीस (Police) शिपाई असे मनुष्यबळ असणार आहे. निवडणुकीसाठी १ हजार ८६२ ईव्हीएम मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ३२ ग्रामपंचायती संवेदनशील असून याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २७८ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक रविवारी होणार आहे. तर मंगळवारी मतमोजणीनंतर (votes counting) निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कलावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष निवडणूक (Election) होत असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून किरकोळ व ठोक देशी विदेशी मद्यविक्री तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी दिलेत.
निवडणुकीसाठी प्रशासनाची कशी आहे तयारी
निवडणूक निर्णय अधिकारी - ९८, झोनल अधिकारी - ८४, विशेष पथक - ६०, मतदान अधिकारी/कर्मचारी - ४२३७, पोलीस कर्मचारी - १७८४, ईव्हीएम - १८६२
तालुका - सदस्य - उमेदवार
वाशीम -४३२ - १०९३
मालेगाव -३९० - ९२६
रिसोड - ३६५ - ८५८
मंगरुळपीर -३७२ - ९०१
कारंजा-४२५ - ९१४
मानोरा -३४१ - ७५५
एकूण - २३२५ - ५४४७
तालुका - सरपंच - उमेदवार
वाशीम - ५२ - २९८
मालेगाव - ४८ - २३६
रिसोड - ४५ - २३६
मंगरुळपीर - ४४ - २३७
कारंज - ५७ - २३३
मानोरा - ४१ - १९९
एकूण - २८७ - १४39
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.