Cabinet Expansion News Sarkarnama
विदर्भ

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात वऱ्हाडातील 'या' जिल्ह्यांना मंत्रिपदाची आस; आता तरी मंत्री होणार का?

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : महायुती सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला दौऱ्यावर असताना माध्यमांना दिली होती. मंत्रिमंडळाच्या यादीत पाटी कोरी असलेल्या वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे. आतातरी आपल्याला मंत्रिपद मिळेल, या आशेने अनेक इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे. (Latest Marathi News)

महायुती सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठक पार पडली असल्याची माहिती आहे. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून, त्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कामोर्तब होणार असल्याने भावी मंत्र्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे, तर या सरकारच्या मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद नसलेल्या पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्यांतील इच्छुकांचीही उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा या इच्छुकांना आहे.

वऱ्हाडतील या आमदारांची नावे चर्चेत-

पश्चिम वऱ्हाडतील यवतमाळ जिल्हा वगळता एकाही जिल्ह्याला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे उर्वरित चारही जिल्ह्यांतील सरकारमधील तीनही पक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुकांची यादी मोठी आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय कुटे, सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची नावे चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.

तसेच, अकोल्यातून भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर वाशीम जिल्ह्यातील भाजपचे लखन मलिक, राजेंद्र पाटणी यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. त्यामुळे यापैकी कुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल हे पाहावे लागेल, तर अमरावती जिल्ह्यातील फडणवीस समर्थक आमदार रवी राणा, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा आहे. यापैकी मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

चार जिल्ह्याला हवी किमान तीन मंत्रिपदं-

महाविकास आघाडी सरकारच्या काळात चारही जिल्ह्यांतून तिघांना संधी मिळाली होती. त्यामुळे या सरकारच्या काळातही किमान तीन मंत्रिपदे मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे बुलडाणा, वाशीम आणि अमरावती या जिल्ह्याला मंत्रिपदे मिळू शकतात.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT