Sharad Pawar, Dharma Rao Baba Atram, Ashok Nete News Sarkarnama
विदर्भ

Gadchiroli News : पवारांनी शब्द पाळला तर 'बाबा' असतील आघाडीचे उमेदवार, भाजप चेहरा बदलणार?

Sharad Pawar News : गेल्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला होता.

Atul Mehere

Gadchiroli Lok Sabha Constituency News : गेल्या वर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात 'बाबा' म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम (Dharma Rao Baba Atram) यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असे सुतोवाच केले होते. पवारांनी शब्द पाळला तर तेच २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार अशोक नेते यांच्याजागी नवीन चेहरा देण्याची तयारी चालवली असल्याची माहिती आहे.

गडचिरोली-चिमूर या मतदारसंघामध्ये गोंदिया जिल्ह्यामधील एक आमगाव, गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी, गडचिरोली व अहेरी हे तीन व चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रम्हपुरी व चिमूर हे दोन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ मध्ये निर्माण करण्यात आला. तो अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे. येथे २००९ ते २०१४ कॉंग्रेसचे (Congress) मारोतराव कोवासे खासदार राहिलेले आहेत. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचे (BJP) अशोक नेते (Ashok Nete) येथून निवडून आले आहेत.

आता उत्सुकता लागली आहे ती २०२४ च्या निवडणुकीची कारण भाजपला तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता आणायची आहे. तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रातून भाजपचे खासदार कमी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी यावेळी आघाडीने पक्की 'वज्रमूठ' बांधली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या चेहऱ्यालाच आघाडी उमेदवारी देईल, हे स्पष्ट आहे. येथे अंतर्गत वादाला थारा राहणार नाही, असे तिन्ही पक्षांचे नेते सांगतात. हे खरे ठरल्यास भाजपला ही निवडणूक जड जाणार, हे निश्‍चित. पण भाजप आणि आघाडीकडून उमेदवार कोण असणार, यावरच पुढची गणिते अवलंबून आहेत.

जेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने (NCP) निवडणुका लढल्या, तेव्हा ही जागा कॉंग्रेससाठीच आजवर सुटलेली आहे. २००९ वगळता कॉंग्रेसला येथे यश आलेले नाही. त्यामुळे यावेळी येथे राष्ट्रवादीचा उमेदवार राहण्याची दाट शक्यता आहे आणि शरद पवारांनी गेल्या वर्षीच धर्मराव बाबांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार धर्मरावबाबा असतील, असे सध्यातरी वाटते. पण हे करताना कॉंग्रेसचे नेते नाराज होऊ नये, याचीही काळजी शिर्षस्थ नेत्यांना घ्यावी लागणार आहे. कारण सर्वाधिक लाथाळ्या कॉंग्रेसमध्ये आहेत. ही बाब नियंत्रित झाल्यास आघाडीला ही निवडणूक फारशी जड जाणार नाही.

..तर बाबा काय करणार?

२०२४ मध्ये लोकसभा लढायचीच हा बाबांचा निर्णय पक्का झाला आहे. इतर नेते बघू, ठरवू, श्रेष्ठींनी आदेश दिला तर लढू, अशा भाषा करतात. पण बाबा ठामपणे सांगतात की, लोकसभा लढायचीच. याशिवाय अहेरी विधानसभा मतदारसंघातून मुलगी भाग्यश्री यांना लढवायचेही त्यांनी ठरवले आहे. भाग्यश्री आत्राम या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहून चुकलेल्या आहेत.

महाविकास आघाडीतून तिकीट मिळण्यात अडचण आल्यास धर्मराव बाबा स्वतंत्र विचार करू शकतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा पक्ष, अपक्ष किंवा भाजपची वाट धरण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असे सूत्र सांगतात आणि उमेदवार आयात करण्याची भाजपची जुनी सवय आहे. 'विनिंग फेस' असल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास भाजपही त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकेल, असेही वाटते.

डॉ. नामदेव किरतान हे नावसुद्धा लोकसभेसाठी चर्चेत आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघात त्यांच्या दंडबैठका सुरू आहेत. याशिवाय नामदेवराव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, माजी खासदार मारोतराव कोवासे यांचा मुलगा ॲड. विश्‍वजित कोवासे हे कॉंग्रेसकडून इच्छुक उमेदवार आहेत. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सुटल्यास कॉंग्रेसच्या या नेत्यांना सांभाळून घ्यावे लागणार आहे.

भाजपमध्येही लाथाळ्या...

विद्यमान खासदार अशोक नेते आणि गडचिरोलीचे आमदार आमदार डॉ. देवराव होळी यांच्यामधून सद्यःस्थितीत विस्तवही जात नाही. होळींची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यांना हल्ली खासदारकीची स्वप्नं पडू लागली आहेत. अशोक नेतेंना ॲंटी इनकम्बंसीचा धोका आहे, असे सांगत होळींनीही तयारी सुरू केली आहे. तसेही अशोक नेते २०१४ आणि २०१९ ला निवडून आले. या दोन्ही निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींची जोरदार लाट होती. यावेळी त्या लाटेचा जोर किती राहणार, हे बघूनच भाजपचे शिर्षस्थ नेते निर्णय घेतील. त्यामुळे अशोक नेतेंच्या जागी नवीन चेहरा दिला जाईल, असे राजकीय जाणकार सांगतात.

आमदार डॉ. देवराव होळींनी 'मेक इन गडचिरोली' प्रकल्प राबविला होता. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला होता. महिलांना अगरबत्ती मशीन दिल्या होत्या. मात्र, नंतर महिलांनी आरोप केले की, त्यांची फसवणूक झाली. त्या प्रकरणात आमदार होळींच्या प्रतिमेला थोडाफार धक्का बसला होता.

त्यामुळे त्यांना कितीही स्वप्नं पडली, तरी त्यांचा विचार होणे अवघड वाटते. अशोक नेतेंना रिपीट करायचे नाही आणि होळी पण नाही, असे ठरल्यास भाजपमध्ये डॉ. मिलिंद नरोटेंचा विचार होऊ शकतो. नरोटे सध्या कुठल्याही पक्षात नाहीत आणि सध्या ते 'मोस्ट एलिजीबल कॅंडिडेट' मानले जातात. बदल करायचा झाल्यास भाजप हा विचार करू शकतो. बदलते राजकारण पाहता यावेळी इच्छुकांच्या इकडून तिकडे उड्या पडण्याचीही शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT