ACB officials investigate the alleged bribery case involving the Tiroda Municipal Council, where bill approval was allegedly linked to a bribe demand. The Tiroda ACB case has triggered political attention. Sarkarnama
विदर्भ

Tiroda bribery case : लाचखोर भाजप नगराध्यक्षावर गुन्हा दाखल; चक्क हातावर लाचेचा आकडा लिहिला अन्..., ACBच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

BJP Mayor Bribery Allegations : बिल मंजुरीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार 21 मे 2026 रोजी नगराध्यक्षांना भेटल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. त्यावेळी बिल मंजूर करून देण्यासाठी 3 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने 7 जून रोजी ACBकडे धाव घेतली.

Jagdish Patil

Gondia News, 19 Jul : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषदेत बिल मंजुरीच्या मोबदल्यात लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भाजपचे नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

तिरोड्याचे नगराध्यक्ष अशोक असाटी आणि कैलास वाघमारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ACB कडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराने तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 दरम्यान डेकोरेशन आणि केटरिंगची सेवा पुरवली होती. त्यानंतर त्यांनी 'हर्षल केटरिंग'च्या नावाने 7 लाख 72 हजार रुपये आणि 'उज्वला डेकोरेशन'च्या नावाने 17 लाख 50 हजार रुपये, अशी एकूण 25 लाख 22 हजार रुपयांची बिले मंजुरीसाठी नगरपरिषदेकडे सादर केली होती.

बिल मंजुरीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार 21 मे 2026 रोजी नगराध्यक्षांना भेटल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. त्यावेळी बिल मंजूर करून देण्यासाठी 3 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने 7 जून रोजी ACBकडे धाव घेतली.

तक्रारीची पडताळणी करताना ACBने पंचांसमक्ष संभाषणाची नोंद घेतली. तपासादरम्यान, 6 लाख रुपयांचा धनादेश मिळवून देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची रक्कम देण्यास सांगण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा विभागाने केला आहे. तसेच, पुढील 10 लाख रुपयांच्या धनादेशावेळीही ठरलेली रक्कम देण्याबाबत सूचित करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात आणखी एक बाब ACBच्या तपासात समोर आली आहे. संबंधित भेटीदरम्यान नगराध्यक्षांनी तोंडी मागणी न करता तक्रारदाराच्या उजव्या हातावर '3,20,000' असा आकडा लिहून लाचेचा संकेत दिल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. यानंतर 9 जून रोजी ACBने सापळा रचला. तक्रारदाराला आरोपींकडे पाठविण्यात आले; मात्र संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्याचे टाळल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

तरीही, पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याचा दावा करत ACBने नगराध्यक्ष अशोक असाटी यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अशोक असाटी आणि कैलास किसन वाघमारे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT