

Chembur Tree Fall Report : मुंबईतील चेंबूर येथे झाड कोसळून विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावरून महापालिका प्रशासन आणि महापौरांमध्ये मतभेद उघड झाले आहेत. या दुर्घटनेचा चौकशी अहवाल महापौर रितू तावडे यांनी फेटाळून लावत तो सुधारित करण्याची मागणी केली आहे.
तसेच, सुधारित अहवाल सादर न झाल्यास महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबईतील (Mumbai) चेंबूर दुर्घटनेनंतर धोकादायक झाडांच्या छाटणीबाबत महापालिकेच्या उद्यान विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने दोन सदस्यीय समितीमार्फत चौकशी केली. समितीच्या अहवालात उद्यान विभागाला जबाबदार धरले नसून संबंधित कंत्राटदारावर पाच लाख रुपये आणि सल्लागारावर दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या अहवालावर नाराजी व्यक्त करत भाजप (BJP) महापौर रितू तावडे यांनी केवळ कंत्राटदार आणि सल्लागारावर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही, असे म्हटले. एका विद्यार्थ्याचा जीव गेल्यानंतर केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौरांनी हा अहवाल आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे फेरचौकशीसाठी परत पाठवला असून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून सुधारित अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन न्यायाची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचवेळी महापौरांनी आयुक्त अश्विनी भिडे या कार्यक्षम अधिकारी असून त्या प्रकरणाचा निष्पक्षपणे विचार करतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सुधारित अहवाल सादर केला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, यामध्ये दिरंगाई झाल्यास पुढील स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.