BJP-shivsena
BJP-shivsena sarkarnama
विदर्भ

बाजोरिया-भाजपचे अग्रवाल यांच्यात वाद झालेल्या अकोल्यात ९९ टक्के मतदान

सरकारनामा ब्यूरो

अकोला : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अकोला-बुलडाणा-वाशीममध्ये शुक्रवारी मतदान झाले. अकोला मतदारसंघात ९८.३० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी येत्या मंगळवारी (ता. १४ डिसेंबर) होणार आहे. या मतदारसंघात शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) लढत होत आहे. (Total turnout in Akola Legislative Council election is 98.63 percent)

आज सकाळी आठपासून मतदानाच्या प्रक्रियेला सुरवात झाली. अकोला, वाशीम व बुलडाणा या तीन जिल्ह्याच्या संयुक्त मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया व भारतीय जनता पक्षाच्या वतीने वसंत खंडेलवाल यांच्यात थेट लढत आहे.

अकोला-बुलडाणा-वाशीम मतदारसंघात तिन्ही जिल्ह्यातील ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी २२ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. मतदानाकडे १४ सदस्यांनी पाठ फिरविली. त्यात आठ पुरुष व सहा महिला मतदारांचा समावेश आहे. तिन्ही जिल्ह्यातील २२ पैकी १७ केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड व बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि नांदुरा या केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. बुलडाणा येथे एक सदस्याने मतदान केले नाही. सर्वात कमी मतदान बार्शीटाकळी येथे ७५ टक्के झाले. येथे २० पैकी १५ सदस्यांनी मतदान केले. पाच मतदार आज बार्शीटाकळीतच नव्हते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, अकोला शहरातील बी.आर. हायस्कूल येथील मतदान केंद्रावर दुपारी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे महानगराध्यक्ष व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यात मतदान केंद्रावर थांबण्यावरून शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून वाद मिटवण्याची वेळ आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदान केंद्रावर धाव घेत समेट घटवून आणला.

आमदार गोपीकिश बाजोरिया व त्यांचा मुलगा आमदार विप्लव बाजोरिया हे दुपारी मतदान केंद्रावर आले. त्यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून तेथे बसलेले होते. ते येणाऱ्या प्रत्येक मतदाराची विचारपूस करून मतदान करण्यासंदर्भात विनंती करीत होते. ते बघून आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या फालतू लोकांना बाहेर काढा, अशी सूचना पोलिसांना केली. त्यावरून विजय अग्रवाल व आमदार बाजोरिया यांच्यात वाद झाला.

विजय अग्रवाल आणि आमदार बाजोरिया यांच्यात झालेल्या वादाची माहिती मिळताच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर धाव घेतली. भाजपचे आमदार रणधीर सावरकर व उमेदवार वसंत खंडेलवालही तेथे पोहोचले. खासदार अरविंद सावंत यांनी खेळीमेळीच्या वातावरणात मतदान करण्याची विनंती केली. विजय अग्रवाल यांनीही खासदार सावंत मतदान केंद्रावर पोहोचताच त्यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर वाद मिटला. मात्र, त्यानंतर सर्वच पदाधिकारी मतदान केंद्रावर शेवटपर्यंत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT