Bacchu Kadu, Minister of State
Bacchu Kadu, Minister of State Sarkarnama
विदर्भ

बच्चू कडू वादात : बोगस कागदपत्र आणि कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल

सरकारनामा ब्युरो

अकोला : राज्याचे मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) वादात सापडले आहेत. पदाचा गैरवापर, बोगस कागदपत्रांचा वापर आणि कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचे आरोप याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने (vanchit Bahujan Aghadi) त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे. पत्रकार परिषद घेवून हि माहिती देण्यात आली आहे.

अकोला जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करुन कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केला. तसेच यासाठी त्यांनी आपल्या पदाचाही गैरवापर करत यंत्रणांचा यासाठी उपयोग केला असे आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला आहे. याप्रकरणी वंचितकडून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. तसेच कडू यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे की, अकोला जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना मागविलेल्या प्रस्तावानुसार १० मार्च २०२१ रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेवून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवला होता. मात्र जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रस्तावामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीने काम बदल करताना जिल्हा परिषदेच्या यंत्रणेची मान्यता घेतली नाही. परस्पर स्वतःच्या लेटर हेडवर कामांमध्ये बदल केला. मात्र हे काम बदल करण्याचा अधिकार जिल्हा नियोजन समितीला नाही. असे असतानाही जिल्ह्यातील ३ रस्ते जे मुळात शासन दरबारी अस्तित्वातच नाहीत किंवा ज्यांना ग्रामीण रस्ते म्हणून शासनाकडून कोणताही क्रमांक दिला नाही, अशा रस्त्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निधी मंजूर केला. इतकेच नाही तर या कामांची वर्क ऑर्डरही काढली, असाही आरोप वंचितने केला आहे.

जे रस्ते अस्तित्वातच नाही अशा रस्त्यांसाठी निधी मंजूर करून त्या कामाची वर्क ऑर्डर काढणे, काम जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील असताना ते इतर यंत्रणांकडून करून घेण्यासाठी वळती करणे व शासन निधीची अपहार केल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी वंचितने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT