Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

VBA-Gondwana Party Aghadi : आंबेडकरांची विधानसभेसाठी मोठी खेळी; आदिवासींच्या मतांसाठी गोंडवाना पार्टीशी हातमिळवणी!

Rajesh Charpe

Nagpur, 21 September : राज्यातील छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र करून तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत सुरू आहे. या आघाडीत आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोंडवाना गणतंत्र पार्टीचाही समावेश आहे. त्यांनी विधानसभेची निवडणूक एकत्रित लढण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत दलित-आदिवासी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीसोबत होते. ते दुरावत चालल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोंडवाना गणतंत्र पार्टीचा (गोंगपा) पूर्व विदर्भात (vidharbh) बऱ्यापैकी जनाधार आहे. नागपूर जिल्ह्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा परिषद सदस्यही आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघात गोंडवानाचा उमेदवार हमखास उभा असतो. भाजपचे रामटेकमधील माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांची राजकीय सुरुवात गोंडवाना गणतंत्र पार्टीतूनच सुरू झाली होती.

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके यांनी येत्या 6 ऑक्टोबरला कस्तुरचंद पार्क येथे गोंगपा-वंचितची सत्ता संपादन परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वंचित (Vanchit Bahujan Aghadi) आणि आम्ही एकत्रित विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.

तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी मागील महिन्यात विविध आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक नागपूरमध्ये घेतली होती. गोंगपानंतर आणखी काही संघटना व पक्षांसोबत त्यांचे संपर्क अभियान सुरू आहे. मध्यंतरी शेतकरी संघटना, बच्चू कडू यांची प्रहार संघटनेबसोबतही चर्चा झाली आहे. ‘एमएआयएम' सोबत वंचितची चर्चा फिस्कटली असून एमआयएमने स्वतंत्रपणे लढण्याचे आधीच जाहीर केले आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आदिवासींवर अन्याय झाला आहे. त्यांचा निधी इतरत्र वळता करण्यात येते. त्यांचे ‘जल, जमीन, जंगल’ हिसकावून घेण्यात येत आहे. असे असताना आतापर्यंत सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षातील आदिवासी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवलेला नाही. ते आपापल्या पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत.

डीबीटीसारखे धोरण रद्द करण्याची गरज आहे. परंतु यावर कुणीही आवाज उलचलत नाही. त्यामुळे आता खरे आदिवासी सत्तेत सहभागी झाले पाहिजे, याकरिता गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचित बहुजन आघाडीने सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे हरीश उईके यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT