manoj jarange patil prakash ambedkar sarkarnama
विदर्भ

Vanchit Bahujan Aghadi : 27 जागा आणि जरांगेंना उमेदवारी द्या; 'वंचित'च्या प्रस्तावाने 'मविआ' घामाघूम!

Maha Vikas Aghadi Meeting Vanchit Bahujan Aghadi Big Proposal : महाविकास आघाडीतील जागावाटप लवकरच जाहीर होणार असे आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाने जागावाटपात मोठा तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे...

जयेश विनायकराव गावंडे

Maha Vikas Aghadi Latest News :

जागावाटपावरून महाविकास आघाडीची बैठक मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीकडून चार प्रतिनिधी पाठवण्यात आले होते. या बैठकीत वंचितकडून 27 जागांच्या प्रस्तावासह चार मोठे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. तर यामध्ये जालना मतदारसंघातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणीही वंचितकडून करण्यात आली आहे.

Maha Vikas Aghadi मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतर 27 फेब्रुवारीच्या बैठकीला वंचितचा प्रतिनिधी पाठवण्यात आला होता. या बैठकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या तीन पक्षात ठरलेल्या जागावाटपाचा फॉर्म्युला आम्हाला देण्याची मागणी वंचितकडून गेलेले प्रतिनिधी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली होती. त्यानंतर आम्ही तुम्हाला ती माहिती देऊ, असे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले होते. आज (ता.28) रोजी महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे.

वंचितकडून निवडणुकीची तयारी करण्यात आलेल्या 27 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे सादर करण्यात आला आहे. तर मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याची महत्त्वाची मागणी वंचितकडून करण्यात आली आहे. जरांगे पाटील यांना जालनामधून तर, पुणे येथून डॉ. अभिजीत वैद्य यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली आहे. यासह मविआच्या उमेदवारांच्या यादीत 15 ओबीसी तर, 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत, अशा चार मोठ्या प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे केल्या आहेत.

या प्रस्तावासह वंचित बहुजन आघाडीकडून आणखी काही अटी महाविकास आघाडीला टाकण्यात आल्या आहेत. वंचितची कुठल्याही पक्षाशी आघाडी नसताना ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती, त्या लोकसभा मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतील घटकांनी लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि नंतर भाजपत प्रवेश करणार नाही, असा प्रस्ताव देखील वंचितकडून देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही ( Vanchit Bahujan Aghadi ) महाविकास आघाडीला 27 जागांसाठी यादी दिली आहे. काही अपवाद वगळता चर्चा करण्यात येणार आहे. आम्हाला आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी पत्र लिहून अनेकदा मागणी केली होती. घटक पक्षांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. जागावाटपाबाबत तिढा सोडवण्यासाठी आम्ही दिल्लीत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. ज्या दिवशी पवार साहेब, ठाकरे साहेब बैठकीत असतील तेव्हा प्रकाश आंबेडकर देखील येतील, असे डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT