Prakash Ambedkar  sarkarnama
विदर्भ

Vanchit Bahujan Aaghadi : 'वंचित'च्या 'या' निर्णयामुळे भाजपला दिलासा अन् काँग्रेसचं वाढणार टेन्शन?

Nagpur Central Assembly Constituency Politics : जाणून घ्या, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे?

Rajesh Charpe

Vidhan Sabha Election and Nagpur : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिस अहमद यांनी धक्का दिल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात दुसरा उमेदवार शोधला आहे. अपक्ष उमेदवार हाजी मोहम्मद कलाम यांना वंचितने अधिकृत समर्थन जाहीर केले आहे. सोबतच एमआएएमच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही घडामोड भाजपला दिलासा देणारी ठरू शकते. काँग्रेसचे मात्र यामुळे टेन्शन वाढले आहे.

मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नसल्याने राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे(Congress) राष्ट्रीय सचिव अनिस अहमद यांनी वंचित आघाडीत प्रवेश घेतला होता. त्यांनी एबी फॉर्मसुद्धा घेतला मात्र उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी वेळेच्या मुदतीत ते पोहचले नाही. त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. मात्र त्यांनी मुद्दामच उशीर केल्याचा आरोप होत आहे.

आता पाच दिवसानंतर अहमद यांनी यु टर्न घेत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला(Vanchit Bahujan Aaghadi) मध्य नागपूरमधून उमेदवारीपासून वंचित राहावे लागले होते. आता मात्र वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजालाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य नागपूर मतदारसंघात हलबा आणि मुस्लिम समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाने हलबा व मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे दोन्ही समाज नाराज आहेत. हलबा समाजाने प्रतिनिधी म्हणून रमेश पुणेकर यांना उभे केले आहे. आता मुस्लिम समाजालासुद्धा आपला हक्काचा उमेदवार मिळाला आहे. या दोन्ही समाजाच्या उमेदवारांच्या मतांवर भाजपचे(BJP) प्रवीण दटके आणि काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.

भाजपचे उमेदवार प्रवीण दटके वयाच्या चाळीशीतच महापौर झाले होते. सध्या ते विधान परिषदेचे सदस्यसुद्धा आहेत. भाजपने आपल्या पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांना पुढे केले आहे. तर बंटी शेळके हेसुद्धा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मुस्लिम आणि हलबा बहूल मतदारसंघातून निवडून येण्यासाठी भाजपला चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येते. येथे पंधरा वर्षे भाजपचे विकास कुंभारे आमदार होते. त्यापूर्वी अनिस अहमद येथून निवडून आले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT