Solapur, 08 November : तुम्ही 2019 मध्ये पाप केलं. तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आताही तुम्ही ‘मला मुख्यमंत्री करा; म्हणून तुम्ही (उद्धव ठाकरे) दिल्लीच्या गल्लोगल्लीत फिरताय. पण, महाविकास आघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, तर महाराष्ट्राला कसा चालेल, असा बोचरा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपद आणि उद्धव ठाकरे यांची दावेदारी यावरून ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचे सरकार 2019 मध्ये यायला पाहिजे होते. मात्र, खुर्चीसाठी त्यांनी (उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. तुम्ही 2019 मध्ये पाप केलं. तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही आमचं सरकार आणलं. त्याला हिम्मत आणि वाघाचं काळीज लागतं. ऐऱ्या गैऱ्यांचं ते काम नाही.
काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला आहे. तो प्राणपणाने आम्ही जपला.. आम्ही चोरलं म्हणता, तेव्हा तुम्ही काय झोप काढत होतात का? या एकनाथ शिंदेंने शिवसेना वाचवण्याचं काम केलं आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही
शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी आणि कामगारांचं सरकार राज्यात काम करत आहे. लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू केली, यात विरोधकांनी खोडा घातला. मात्र, आम्ही ही योजना कधीच बंद पडू देणार नाही. हा तर ट्रेलर आहे; पिक्चर अभी बाकी आहे. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कजर्जमाफी देणार आहोत.
ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय. तरुणांसाठी 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. राज्यातील 45 हजार गावांत पाणंद रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. शेतीपंपाचे संपूर्ण विजबिल आपण माफ केलं आहे, असेही त्यांनी नमूद केले.
एकनाथ शिंदे शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही
ते म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांच व्हिजन महाराष्ट्र आम्ही जाहीर करू, त्याला हिम्मत लागते. लाडक्या बहिणीच्या योजनेत काम करणाऱ्या सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा. अगोदर फक्त मला एकच सख्खी बहीण होती. आता महाराष्ट्रातील अडीच कोटी माझ्या सख्ख्या बहिणी आहेत. माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. विरोधक म्हणत होते लाडक्या बहिणीसाठी पैसे नाहीत. योजना चोरणाऱ्या महाविकास आघाडीपासून सावध राहा. हा एकनाथ शिंदे कदापि शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही.
वैराग तालुक्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शब्द
वैराग एमआयडीसीसाठी काम सुरु करा, असे मी सभा संपवून गाडीत बसल्यावर उद्योगमंत्र्यांना सांगणार आहे. तसेच , महाराष्ट्रात तालुकानिर्मिती होईल तेव्हा वैराग तालुका होईल, असा शब्दही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिला.
संविधान मंदिर उभारणार
लोकसभेसारखं फसू नका. उंटावरून शेळ्या हाकणारा एक माणूस दिल्लीवरून आला होता. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात जास्त काँग्रेस पक्षानेच छळलं आहे. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळतं घर आहे. काँग्रेसने संविधान दिन गेली 50 ते 60 वर्षे का साजरा केला नाही. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिन साजरा केला. आपण जागोजागी संविधानाचे मंदिर बनवत आहोत. जब तक सूरज चाँद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.