Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettivar: जरांगेंनी मुंबई जाम केली! आता OBC पुणे अन् ठाणे जाम करणार? सकल ओबीसी समाजाचा सरकाराला इशारा

Vijay Wadettivar OBC Morcha: मराठा आणि ओबीसी असा पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rajesh Charpe

Vijay Wadettivar OBC Morcha: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगेनं मुंबई जाम केली, त्याच्यापुढं महायुती सरकार झुकलं. त्याच्या इच्छेनुसार हवा तसा जीआर काढण्यात आला. कोंडी करणं हाच निकष असेल तर आम्ही सुद्धा मुंबईच काय तर पुणे आणि ठाणे सुद्धा जाम करतो अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना इशारा दिला. हे बघता आता मराठा आणि ओबीसी असा पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जरांगे यांच्या आग्रहास्तव काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधात नागपूरमध्ये सकल ओबीसी बांधव आज एकवटले आहेत. समाजाच्यावतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. विदर्भच नव्हे तर कोकणातूनसुद्धा अनेक ओबीसी बांधव यात सहभागी झाले होते. याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके, महादेव जानकर, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री सुनील केदार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, भंडाराचे खासदार प्रशांत पडोळे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रकाश अण्णा शेंडगे, रवींद्र दरेकर, नरेंद्र जिचकार आदीही यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी वडेट्टीवार म्हणाले, "जरांगेच्या दबावाखाली सरकार फक्त झुकले नाही तर कमरेपासून वाकले आहे. ३४७ मूळ जाती आणि पोटजाती मिळून तब्बल ८८१ जातींचा ओबीसीत समावेश आहे. ५६ टक्के समाजाला फक्त २७ टक्के आरक्षण दिले जाते. दुसरीकडे मराठा ही एक जात आहे, त्यांना १० ईडब्ल्यूएसचे आरक्षण दिले जाते, असे असतानाही त्यांना ओबीसीत दाखल करून घेतले जात आहे. हा अन्याय नाही तर काय आहे असा सवाल वडेट्टीवारांनी केला. माझा डीएनए ओबीसी आहे म्हणणाऱ्या नेत्यानेच ओबीसीचा गळा कापला. जीआर त्यांनी काढला. राजकारणाचा आरोप आमच्यावर केला जात आहे.

आता जाती उपवर्गीकरणाचा खटाटोप केला जात आहे. धनगर आणि आदिवासींना एकमेकांसमोर उभे केले. बंजारा समाजात असंतोष निर्माण केला. सर्व जातीजमातींमध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे. तुझेही नाही आणि माझेही नाही घाल कुत्र्याला अशी परिस्थिती निर्माण करून आरक्षणच मुळापासून संपुष्टात आणण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. हाच सरकारचा अजेंडा. त्यामुळे ओबीसींना सावध राहिले पाहिजे. असेच चालू राहिले तर तर उद्या तुम्ही कुठे दिसणार नाही, संपून जाल. जो पर्यंत जीआर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचे नाही. तरच आपण वाचू. आपल्याला मारेल त्याला मारण्याची तयारी ठेवा. तेव्हाच या महायुती सरकारला होश येईल. जीआर रद्द होईपर्यंत स्वस्थ बसू नका. त्यासाठी मुंबईसह पुणे ठाणे जाम करण्याची तयारी ठेवा. तेव्हाच न्याय मिळेल. आजचा मोर्चा ही फक्त झाकी आहे असे सांगून वडेट्टीवार यांनी सरकारला आव्हान दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT