Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar News : तहसीलदारच काय, मुख्यमंत्र्यांचीही कंत्राटी भरती होऊ शकते; विजय वडेट्टीवारांचा टोला

अतुल मेहेरे

Nagpur Political News : कंत्राटी नोकर भरतीच्या मुद्द्यावरून मध्यंतरीच्या काळात राज्यात वादाचे वादळ निर्माण झाले होते. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलासा करावा लागला होता. त्यावरही विरोधकांचे समाधान न झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. आता जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार पदावर कंत्राटी पद्धतीने नियुक्तीची जाहिरात प्रकाशित झाल्याने विरोधकांना पुन्हा आक्रमक व्हायला संधी मिळाली आहे. (Latest Political News)

तहसीलदार पदाच्या जाहिरातीबद्दल बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. 'सध्या राज्यात जी काही राजकीय परिस्थिती आहे त्यावरून उद्या मुख्यमंत्री पदावरही ही कंत्राटी भरती केली, तर नवल वाटू नये,' असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले. तहसीलदारापासून मुख्यमंत्रीपर्यंत ही कंत्राटी जाहिरात जाऊ नये. सहा महिने मुख्यमंत्री, तीन महिने उपमुख्यमंत्री राहतील,' असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

'सरकारमधील विविध पदे १५ ते २० टक्क्यांनी विकण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारला भीक लागली का, कायमस्वरूपी नोकर भरतीच्या नावावर कंत्राटी पद भरती करून सरकार बेरोजगारांना फसवत आहे. हे सरकार केवळ खोके भरण्याचे काम करीत आहे. बेरोजगार तरुणांचा पैशांवर व्याज खाण्याचा प्रकार सर्वत्र सुरू आहे,' अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली. (Maharashtra Political News)

बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे नोकऱ्या बळकावण्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आपली जुनीच मागणी आहे. सरकार त्यावर निर्णय घेत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, साक्षी पुराव्यांच्या आधारावर हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात असल्याने निकाल लागत नाही. वेळकाढूपणा करत शिंदे गटाला जीवनदान देण्याचं काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे गटाला योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात जाईल, हे ठाऊक असल्यानेच भाजपने अजित पवारांना जवळ केले आहे. लवकरच शिंदे गटाला विसर्जन करून भाजप अजित पवार यांच्यासोबत नव्याने संसार थाटेल, अशी टीकाही विजय वडेट्टीवारांनी केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT