Mumbai Political News : मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनांनी राज्यात वातावरण तापले आहे. याला आता तहसीलदारासारखी काही महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरतीच्या निर्णयाने फोडणी मिळाली आहे. या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले असून, सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यातच सुप्रिया सुळेंनी या निर्णयावर भाजपच्या हेतूवर शंका घेऊन खोचक सवाल केले आहेत. याला भाजपनेही महाविकास आघाडीतील भरती घोटाळ्याची आठवण करून देत सडेतोड उत्तर दिले. सुळे आणि भाजपचे या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. (Latest Political News)
सुळे यांनी मंत्रिमंडळच कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, असा टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, 'भाजपला या महाराष्ट्राचे काय करायचे आहे, हे समजत नाही. आता तहसीलदारही कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारने घातला आहे. या सरकारने मुख्यमंत्री, हवे तेवढे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळच कंत्राटी पद्धतीने चालवायला द्यावे. हे सरकार असे असंवेदनशील निर्णय का घेत आहे, याचे आश्चर्य वाटते.'
सरकारवर टीका केल्यानंतर सुळेंनी एमपीएसीचा अभ्यास करणाऱ्या मुलांची काळजी व्यक्त केली. 'राज्यात लाखो मुले तहसीलदार आणि तत्सम पदांसाठी एमपीएससीची परीक्षा देतात. त्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. त्यांची अर्धी संधी अगोदर लॅटरल एन्ट्रीच्या नावाखाली आणि उरलेली अर्धी कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली गिळंकृत केली गेली. संपूर्ण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणारे हे आदेश काढण्याआधी किमान या मुलांचा तरी विचार शासनाने करायला हवा होता,' असे म्हणत राज्यकर्ते मूळ हेतू विसरत असल्याची टीका सुळेंनी केली.
Supriya Sule सुप्रिया सुळेंच्या या ट्विटला भाजपकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. तुम्ही सत्तेत होता त्यावेळी बॅकलिस्ट कंपन्यांना नोकरभरतीचे कॉन्ट्रॅक्ट देऊन परीक्षा घेतल्या होत्या. प्रीतेश देशमुख, न्यासा कम्युनिकेशन याबद्दल आम्ही तोंड उघडले तर तुमच्या पक्षाचे अवघड होईल. तुमच्या काळात स्पर्धा परीक्षेत भ्रष्टाचार तर झाला म्हणून तत्कालीन सरकारला भरतीही रद्द करावी लागलेली होती. आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल. परत राजकीय द्वेष म्हणून रडू नका, असा इशारा भाजपने सुळेंना दिला आहे.
आपल्यासारख्या अभ्यासू संसदरत्न लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत राजकारण करत असतील तर त्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा फॅक्ट समजावून घेऊन प्रतिक्रिया द्यायला हवी होती. ही कंत्राटी भरती काय आहे, हे नेमके आपण समजूनच घेतले नाही. (Maharashtra Political News)
ही भरती परमनंट नाही. तसेच MPSC च्या कोणत्याही जागा कमी किंवा रद्द करून ही भरती करण्यात येणार नाही. काही तत्काळ कामासाठी तातडीने अधिकाऱ्यांची गरज आहे आणि एवढ्या कमी वेळेत आवश्यक ते अधिकारी मिळणे अशक्य आहेत. त्यामुळे कामे लवकर होण्यासाठी ही तत्काळ भरती होत आहे, असाही खुलासा भाजपने ट्विटद्वारे केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.