Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांनी कन्या शिवानीच्या बाजूने विधान अन् चंद्रपुरात काँग्रेसच्या उमेदवारीबाबत 'ट्विस्ट'!

संदीप रायपूरे

Chandrapur Lok Sabha Constituency and Congress चंद्रपूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये आतापासूनच कमालीची रस्सीखेच बघायला मिळत आहे. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तथा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली.

त्यांची उमेदवारी प्रभावी मानली जात असतांना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी बाँम्ब टाकला. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगत त्यांनी चंद्रपूरच्या राजकारणात ट्विस्ट आणला.

यानंतर वडेट्टीवारांची कन्या शिवानी हिने आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी पक्ष आपल्यासारख्या युवा नेतृत्वाला जरूर संधी देईल असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी शिवानीची मागणी रास्त असल्याचे म्हटले. शिवानी गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे प्रभावीपणे काम करत आहे. तिला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असे त्यांनी स्पष्ट केले.

काही वर्षापुर्वी पक्षात आलेले जर उमेदवारी मागत असतील, तर शिवानीच्या मागणीत गैर काय असे म्हणत त्यांनी आमदार प्रतिभा धानोरकरांवर प्रहार केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. अशावेळी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांनी धावपळ सुरू केली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्ष भाजपाची सत्ता होती. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाच्या गडाला सुरूंग लावला. बाळू धानोरकर यांनी भाजपाचे(BJP) मातब्बर नेते हंसराज अहिर यांचा पराभव केला. धानोरकरांच्या विजयात विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

मागील निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतांना चंद्रपूरच्या मतदारसंघात विजय मिळवीत काँग्रेसने लाज राखली होती.पण दरम्यानच्या काळात खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाले.

यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीचा अर्जही सादर केला आहे. पक्ष जरूर आपणास संधी देईल असा विश्वास त्यांना आहे.काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी मिळणार असे वाटत आहे.

पण मध्यतंरीच वडेट्टीवारांनी पक्षाने संधी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते.यानंतर काल त्यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा सार्वजनिक केली.आपण युवा असून गेल्या अनेक वर्षापासून अतिशय प्रभावीपणे पक्षाचे काम करत असल्याचे सांगत पक्ष जरूर आपणास संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वडेट्टीवार आणि त्यांच्या कन्येच्या या विधानांमूळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारीबाबत ट्विस्ट निर्माण झाला आहे. लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात कमालीची रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT