Wardha-Nanded Railway Track. Sarkarnama
विदर्भ

Narendra Modi : पंतप्रधान कार्यालयाने थेट विदर्भाच्या रेल्वे विभागालाच केली विचारणा की...

प्रसन्न जकाते

Wardha Railway : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग पूर्णपणे तयार झालेला आहे काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मार्गाचे शुक्रवारी (ता. 12) स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवादिनाच्यानिमित्ताने लोकार्पण करायचे आहे, अशी विचारणा थेट पंतप्रधान कार्यालयातून रेल्वे विभागाला करण्यात आली आहे. ‘पीएमओ’कडून झालेल्या या विचारणेमुळे हा लोहमार्ग आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सुमारे 206 किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत या मार्गासाठी खर्च झाला आहे. वर्ध्यापासून यवतमाळपर्यंतच्या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या रेल्वेमार्गाचे लोकार्पण लोकसभा निवडणुकीपूर्वी करण्यात येणार आहे.

या रेल्वेमार्गावर 15 मोठे पूल, 29 बोगदे आणि 5 उड्डाणपूल आहेत. वर्धा ते कळंब हे 40 किलोमीटरच्या अंतराचे काम ‘रेडी टू रन’ आहे. देवळी येथेही रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. 2009 मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात 2016 मध्ये प्रकल्पाचे काम सुरू झाले. अशात आता ‘पीएमओ’कडून रेल्वेमार्गाबाबत थेट विचारणा झाल्याने या मार्गावरील सेवा 2024 मध्येच सुरू होणार असल्याचे ठामपणे सांगण्यात येत आहे.

लोकार्पणाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित राहणार आहेत. वर्धा, देवळी, यवतमाळ येथील आमदार व खासदार यावेळी उपस्थित असतील. लोकार्पणाचा हा कार्यक्रम कळंब रेल्वेस्थानकावर करण्याची तयारी सुरू आहे, तर काहींना हा कार्यक्रम वर्धा रेल्वेस्थानकावर घ्यायचा आहे. या लोहमार्गाच्या कामाबाबत खासदार रामदास तडस सुरुवातीपासूनच आग्रही होते. त्यामुळे हा सोहळा वर्धा स्थानकावर व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तयार झालेल्या या मार्गाची नुकतीच खासदार रामदास तडस, नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव यांनी पाहणी केली. डिसेंबर 2024 पासून या मार्गावरील रेल्वेसेवा सुरू होईल, असे संकेत त्यांनी दिले. सध्या वर्धा येथून नांदेडला जाण्यास 10 तास लागतात. नवीन रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर केवळ 4 तासांत हे अंतर पार करणे शक्य होणार आहे. विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा असा हा अत्यंत महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प आहे. प्रकल्पाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला वर्धा ते कळंब सेवा सुरू होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

वर्धा, देवळी, भिंडी, कळंब, तळेगाव, दारव्हा, यवतमाळ, दिग्रस, पुसद, उमरखेड, हदगाव, अर्धापूर, हुजूरसाहेब नांदेड रेल्वेस्थानक यामुळे जोडली जाणार आहेत. या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील सहा तालुक्यांना आणि 90 गावांना थेट लाभ होणार आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT