Sanjay Kute & Water Supply. Sarkarnama
विदर्भ

Water Supply Disconnected : भाजप आमदाराच्या मतदारसंघातील 128 गावांत पाण्यासाठी हाहाकार

Salt Water Belt : खारपाणपट्ट्यातील ग्रामपंचायतींवर तब्बल 13 कोटींवर थकबाकी

सरकारनामा ब्युरो

फहीम देशमुख

Water Supply Disconnected : पाणीपट्टी वसुलीअभावी 140 गाव वान धरण योजनेतून खारपाणपट्ट्यातील 128 गावांचा पाणीपुरवठा अचानकपणे खंडित करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत पारा वाढत असल्याने खारपाणपट्ट्यातील पाणीटंचाई गंभीर स्वरूप धारण करीत आहे. यासाठी संजीवनी ठरू पाहणारी वान धरण 140 गाव पाणीपुरवठा योजना वसुलीअभावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग जळगाव जामोदकडून 128 गावांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. 20) सकाळपासून याची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मतदारसंघातील या गावातील नागरिकांवर सध्या पाणीटंचाईचे भीषण सावट आहे.

जमिनीतील क्षारयुक्त पाणी पिल्याने आतापर्यंत हजारो नागरिकांना आपले जीव किडनी आजाराने गमवावे लागले आहेत. आजही मृत्यूचे हे तांडव सुरूच आहे. संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे दोन्ही तालुके खारपाणपट्टा म्हणून ओळखण्यात येतात. या दोन्ही तालुक्यांत जमिनीतील पाणी पिल्याने किडनीच्या आजाराने हजारो मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना हनुमानसागर धरणावरून जलवाहिनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, आता या दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीचे 13 कोटी 39 लाख 95 हजार रुपये न भरल्याने या दोन्ही तालुक्यांतील 128 गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. यात संग्रामपूर तालुक्यातील 69 गावे, तर जळगाव जामोद तालुक्यातील 59 गावांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यासंदर्भात निर्णय 16 फेब्रुवारीला दोन्ही तालुक्यांतील संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांना एका पत्रातून कळविण्यात आलेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ग्रामपंचायतींनी काही प्रमाणात पाणीपट्टी कर भरल्यास नागरिकांची पाणी कोंडी थांबवता येते. मात्र, ग्रामसेवकांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने दोन्ही तालुक्यांतील लाखो नागरिकांना शुद्ध गोड पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकंतीची वेळ येणार आहे. वारी भैरवगड येथील हनुमानसागर धरणावरून जलवाहिनीच्या माध्यमातून 140 गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत खारपाणपट्ट्यातील गावांना पाण्याचा पुरवठा सुरू आहे. मात्र, संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यांतील 128 गावांकडे 2017 ते 2023 पर्यंत या योजनेची तब्बल 13 कोटी 39 लाख 95 हजार 60 रुपयांची पाणीपट्टी थकविण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला 2023-24 या आर्थिक वर्षात 2 कोटी 33 लाख 8 हजार 486 रुपयांची पाणीपट्टी दोन्ही तालुक्यांतील ग्रामपंचायतींकडून अपेक्षित आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीचा भरणा केला नसल्याने मंगळवार (ता. 20) पासून दोन्ही तालुक्यांतील 128 गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

या भागातील आमदार डॉ. संजय कुटे मात्र मतांचे राजकारण करताना खारपाणपट्ट्यातील नागरिकांना आपल्या गणितात धरतात. मात्र, आतापर्यंत किडनी आजाराने हजारो जीव गमावणाऱ्यांसाठी ठोस उपाययोजना मात्र झालेल्या नाहीत. हनुमान सागरातून 140 गावांसाठी गोड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचेही ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीचे 13 कोटी 39 लाख 95 हजार रुपये न भरल्याने या दोन्ही तालुक्यांतील 128 गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. कुटेंच्या या मतदारसंघात आता हजारो नागरिकांना गोड पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

खारपाणपट्ट्याचा प्रभाव!

विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा या तीन जिल्ह्यांत चार लाख 70 हजार हेक्टरवर पसरलेला खारपाणपट्टा हा भारतातीलच नव्हे, तर जगातील एक नावीन्यपूर्ण असा भूभाग म्हणावा लागेल. खारपाणपट्ट्यातील जमिनीत जसजसे खोल आपण जाऊ तसतसे क्षार वाढत जातात. जमिनीत क्षार आणि खार असे दोन्ही आहे. हा भूभाग बेसॉल्ट खडकापासून तयार झाल्याचा निष्कर्षही कृषी विद्यापीठ तज्ज्ञांनी नोंदविला आहे. पूर्व ते पश्चिम 150 किलोमीटर लांब आणि उत्तर ते दक्षिण 60 किलोमीटर रुंद असा हा खारपाणपट्टा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील 894 गावे खारपाणपट्ट्यात आहेत. यामध्ये सर्वाधिक जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील गावे आहेत.

तहानलेली गावे

संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर, बोरखेड, झाशी, निमखेड, मारोड, पंचाळा खुर्द, पंचाळा बुद्रुक, उमरा, पळशी, लोहगाव, टुनकी खुर्द, शेतखेड बुद्रुक, शेतखेड खुर्द, लाडणापूर, टुनकी बुद्रुक, सोनाळा, सायखेड, पिंगळी बुद्रुक, पिंगळी खुर्द, आलेवाडी, तामगाव, कळमखेड, टाकळेश्वर, कवठळ, कुंभारखेड, संग्रामपूर, निरोड, काथरगाव, पिंप्री, बोडखा, भिलखेड, काकोडा, हिंगणा, चॉडी, एकलारा, वरवट बकाल, मोमिनाबाद, काटेल, पिंप्री अडगाव, अवार, पातुर्डा खुर्द, उकळी बुद्रुक, कुंदेगाव, आस्वंद, देऊळगाव, उकडगाव, वरवट खंडेराव, दुर्गादैत्य, वानखेड, कोद्री, टाकळी पंच, नेकनामपूर, पातुर्डा बुद्रुक, मनार्डी, जस्तगाव, खिरोडा, अकोली बुद्रुक, अकोली खुर्द, राजपूर, रुधाना, सावळा, धामणगाव, निवाणा, चांगेफळ खुर्द, चांगेफळ बुद्रुक, वकाना, सावली, मालठाणा, दयालनगर या 69 गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील जामोद, सुनगाव, मांडवा, निमकराड, करनवाडी, पळशी वैद्य, पळशी घाट, अडोळ, पिंप्री कोदरी, आसलगाव, खांडवी, झाडेगाव, बाळापूर, पिंपळगाव काळे, येणगाव, कुरणगड खुर्द, निभोरा खुर्द, वडशिंगी, परशरामपूर, तरोडा खुर्द, तरोडा बुद्रुक, कुरणगड बुद्रुक, भेंडवड खुर्द, भेंडवळ बुद्रुक, इलोरा, चावरा, पळसखेड, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, सुकळी, गाडेगाव खुर्द, टाकळी खासा, टाकळी पारसकर, गोळेगाव खुर्द, सताली, सावरगाव, गाडेगाव बुद्रुक, अकोला खुर्द, गोळेगाव बुद्रुक, उटी बुद्रुक, उटी खुर्द, वाडी बुद्रुक, वाडी खुर्द वडगाव पाटण, टाकळी खाती, पाटण, निभोरा बुद्रुक, हाशमपूर, वडगाव गड, इस्लामपूर, धानोरा, सूलज, पळशी सुपो, नवखुर्द, मोहिदपूर, रसुलपूर, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, बोराळा खुर्द, बोराळा बुद्रुक ही गावेही तहानलेली राहणार आहेत.

Edited By : Prasannaa Jakate

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT