Sunil Kedar  Sarkarnama
विदर्भ

Sunil Kedar : भाजपची रणनीती सुरू, तर माजी मंत्री सुनील केदार कोणती राजकीय खेळी खेळणार?

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभेसाठी कधीही आचार संहिता जाहीर होईल. अशातच जिल्ह्यातील महत्वाचा असलेला सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडणूक जिंकणारे माजी मंत्री सुनील केदार या वेळी निवडणुकीत जवळपास नाही.

त्यामुळे भाजपकडून सध्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. गेल्या 25 वर्षांमधलं काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपने ताकदीनं कामाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Election) तोंडावर माजी मंत्री केदार यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोह कुंभारे यांना भाजपात प्रवेश दिला. याचा परिपूर्ण फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत व्हावा, या अनुषंगाने सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदार संघात लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. गेली 20 वर्षे सक्रिय राजकारणाचा मोठा अनुभव कुंभारे आजमावत असून, ते सावनेर येथून निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत.

दुसरीकडे सुनील केदार मैदानात नसले, तरी मैदान मारण्याची कला त्यांना आहे. ते जो उमेदवार देतील तोच उमेदवार फायनल असेल. लोकसभा, विधान परिषद, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत केदारांनी काँग्रेसचा (Congress) उमेदवार जिंकून देत दबदबा कायम ठेवला. नागपूर ग्रामीणच्या विधानसभेतील सर्व सहा उमेदवार विजयी करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा स्थितीत सावनेर विधानसभेसाठी भाजप केदारांसाठी काय रणनिती आखणार याकडे देखील लक्ष लागलं आहे.

भाजप कोणते कार्ड वापरणार?

सावनेर-कळमेश्वर मतदारसंघात 97 हजार जवळपास तिरळे कुणबी असून 52 हजार धनोज कुणबी या समाजाचे मतदार आहेत. या खोलोखाल 41 हजार एससी, 23 हजार तेली समाज, 17 हजार माळी, तसेच 85 हजार इतर समाजाचे मतदार या मतदारसंघात आहेत. अशा स्थितीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार तिरळे कुणबी राहिल्यास, भाजप धनोज कुणबी कार्ड खेळणार, अशी सूत्राची माहिती आहे.

अमोल देशमुख यांची दावेदारी

या मतारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केलेले माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे सुपुत्र अमोल देशमुख यांनी यावेळी या मतदार संघावर काँग्रेसकडून दावा ठोकला आहे. यामुळे या मतदारसंघात देशमुखांचे कार्यकर्ते बऱ्याच प्रमाणात असल्याने अमोल देशमुख सुद्धा येथून लढण्यास इच्छुक आहेत.

दृष्टिक्षेपात सावनेर मतदारसंघ

या मतदारसंघात एकूण 181 गावे असून, एकुण 3 लाख 14 हजार मतदार आहेत. यामध्ये प्रामुख्याने 1 लाख 59 हजार पुरुष मतदार, तर 1 लाख 55 हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात सद्या 4 नगरपरिषद, 9 जिल्हा परिषद सर्कल आहेत. मतदार संघाचे प्रतिनिधीत्व 1962 ला पहिले आमदार होण्याचा मान नरेंद्र तिडके यांना आहे. ते सलग तीन वेळा येथील आमदार होते. यानतंर 1978 ते 1985 या कालखंडात रामजी नाईक यांनी आमदारकी भूषविली, 1985 ते 1995 या कालावधीत माजी मंत्री रणजीत देशमुख यांनी आपले वर्चस्व ठेवले. यानतंर 1995 ला माजी मंत्री सुनील केदार यांची या मतदारसंघात मुसंडी मारली. मात्र 1999 ला भाजपचे देवराव आसोले यांनी केदारांचा पराभव करीत आमदार झाले. यानंतर 2003-04 ला या मतदार संघाचे परिसिमन झाल्याने पारशिवनी तालुका वगळून या मतदार संघात कळमेश्वर तालुक्याचा समावेश करण्यात आला. यामध्ये 2003-04 पासून सलग चार वेळा माजी मंत्री केदार येथून निवडून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT