Sandeep Joshi-Vijay Wadettiwar Sarkarnama
विदर्भ

Sandeep Joshi : मुलीला बार उघडून देणाऱ्या वडेट्टीवारांकडून संस्कारांची काय अपेक्षा ठेवायची?; नवनिर्वाचित आमदार जोशींचा पलटवार

Vijay Wadettiwar Statement : विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य ऐकून चीड येण्यापेक्षा मला त्यांची कीव करावीशी वाटते. खरा इतिहास तोडून मोडून कसा जनतेसमोर मांडावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे वडेट्टीवार यांचे वक्तव्य आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 31 March : राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला आणि आम्ही गुढी बिडी उभारतो, असे वक्तव्य करणारे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या संस्कारावरच आमदार आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी बोट ठेवले. अर्थार्जनाकरता मुलीला बार उघडून देणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायच्या आणि त्यांच्याकडून काय इतिहासाचे धडे घ्यायचे, अशा शब्दात जोशी यांनी वडेट्टीवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

आमदार संदीप जोशी (Sandeep Joshi) म्हणाले, वडेट्टीवार यांचे वक्तव्य ऐकून चीड येण्यापेक्षा मला त्यांची कीव करावीशी वाटते. खरा इतिहास तोडून मोडून कसा जनतेसमोर मांडावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य आहे. अर्थात, वडेट्टीवार यांच्या संस्कारांची परिभाषाच निराळी आहे. अर्थार्जनाकरता मुलीला बार उघडून देणारे वडेट्टीवार संस्कार आणि संस्कृतीची अपेक्षा करता येणार नाही.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या चुकीच्या विधानाला उत्तर देणे, हे मला गरजेचे वाटते. नाहीतर हे महाशय अशीच विधाने करीत राहणार आणि जनतेची दिशाभूल करत राहणार. वडेट्टीवार हे स्वतः एक हिंदू असून देखील गुढी आणि बिडी असा उच्चार करतात, याचे आश्चर्य वाटते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हिंदू नववर्षाचे स्वागत करतो आणि त्यानिमित्ताने गुढ्या आणि पताका उभारतो. ही एक हिंदू अस्मिता आहे. विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) एकदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नीट वाचावा, म्हणजे याचे उत्तर त्यांना नक्कीच मिळेल, असा सल्लाही संदीप जोशी यांनी वडेट्टीवार यांना दिला.

जोशी म्हणाले, आता राहिला प्रश्न गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, ते १६८० वे वर्षे होते. गुढीपाडवा साजरा करण्याची परंपरा ही महाभारताच्या काळापासून सुरू आहे. महाभारत आदी पर्व अध्याय क्रमांक ६३ मध्ये उपरीचर राजा आणि इंद्राची गोष्ट सांगण्यात आली आहे. सज्जनांचा प्रतिपाळ करणारी कळकाची एक काठी इंद्राने त्या उपरीचर राजाला बहाल केली होती.

इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरीचर राजाने ती काठी जमिनीत रोवून ठेवली. तेव्हापासून उपरीचर राजाने सुरू केलेल्या प्रघाताप्रमाणे आज देखील वर्षाच्या शेवटच्या दिवशी जमिनीत काठी रोवतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे नवीन वर्ष प्रारंभ होत असल्याने त्या काठीवर शेल्यासारखे एखादे उंची वस्त्र बांधून विधीपूर्वक काठीची पूजा केली जाते. त्यालाच गुढीची पूजा म्हणतात. हे केवळ वडेट्टीवारांच्या माहितीकरता मी नमूद करतोय, असेही आमदार जोशी यांनी नमूद केले.

वडेट्टीवार यांनी असली प्रक्षोभक विधाने करून समाजमन स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणे बंद करावे. खरा इतिहास लोकांसमोर येऊ द्यायचा नाही ही काँग्रेस नीती आता जनतेच्या देखील लक्षात आली आहे. छत्रपतींच्या नावाचा वापर आपण फक्त आणि फक्त्त राजकारणाकरता कसे करतो, हेच आजवर काँग्रेस पक्षाने दाखवले आहे. त्याचाच कित्ता वडेट्टीवार गिरवत असल्याची टीकाही संदीप जोशी यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT