माजी महापौर संदीप जोशी म्हणतात, देवेन्द्र... तुला सलाम !

पुन्हा एकदा आपला देवेंद्र (Devendra Fadanvis) या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणून. परंतु पत्रकार परिषद बघितली आणि लक्षात आलं काहीतरी भयानक घडतंय…
Devendra Fadanvis Banner, Sandip Joshi
Devendra Fadanvis Banner, Sandip JoshiSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : काल महाराष्ट्रानं जे अनुभवलं, ते यापूर्वी कधीही घडलं नसावं. देवेंद्र फडणवीस, जे मुख्यमंत्री होणार होते, त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली आणि गुवाहाटीला असताना ज्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक मुख्यमंत्री बनले. या घटनाक्रमात जे २०१४ ते २०१९ असे पाच आणि २०१९ पासून आजतागायत भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी जे झटले, त्या देवेंद्र फडणवीसांसाठी अनेकांचे मन दुखले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री न झाल्यामुळे भाजपमध्ये ‘कहीं खुशी, कहीं गम’ची परिस्थिती आहे. तेच मुख्यमंत्री व्हावे, असे अनेकांना वाटत होते. येवढेच काय पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीसुद्धा पत्र लिहून फडणवीसांच्या औदार्याचे मनापासून कौतुक केले. असेच एक पत्र नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी (Sandip Joshi) यांनी फडणवीसांना लिहिले आहे.

पत्रामध्ये संदीप जोशी म्हणतात ‘मन सुन्न झालं... मेंदू बधीर झालाय… दुपारी १.३० वाजताच तुझ्याशी भेटलो. मनात अत्यंत आनंद होता पुन्हा एकदा आपला देवेंद्र या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणून. परंतु पत्रकार परिषद बघितली आणि लक्षात आलं काहीतरी भयानक घडतंय… किती सहजपणे तू एकनाथ शिंदेंची घोषणा केलीस..! तुझ्या सोबत असणाऱ्या लोकांनाही त्याचा तडाखा बसलेला जाणवत होता. त्यांनादेखील याची कल्पना नव्हती की तू मुख्यमंत्रिपद स्वत:हून सोडलेलं आहे. मागील अडीच वर्षांपासून तू भारतीय जनता पक्षाचा एकहाती किल्ला महाराष्ट्रात लढवत होतास. मग ‘पुन्हा येईन…’ वरून तुझी केलेली हेटाळणी… अमृतावरून तुझ्यावर तारतम्य सोडून गलिच्छ भाषेतील टिका टिप्पणी... शरीरावरून केलेली अर्वाच्च भाषा... अनेकदा तुला दिलेली भरगच्च शिवीगाळ शांतपणाने चेहऱ्यावरून कधीही काहीही न दाखवता तू सहन करत होतास. हे होत असताना तू मुख्यमंत्री नाहीस हे दाखवत देखील नव्हतास. पायाला भिंगरी असल्यासारखा वेड्यागत फिरत होतास. कोव्हिड काळात सन्माननीय माजी मुख्यमंत्री घरात बसले, परंतु तू मात्र आपलीच जबाबदारी असल्यासारखा वेड्यासारखा फिरत राहिलास. कोव्हिड झाल्यानंतर देखील तू सरकारी दवाखान्यात भरती होऊन उपचार घेतलास परंतु इतर सर्व मंत्री अनेक लाख रुपये देऊन खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती झाले. हाच तुझ्या आणि त्यांच्यातला फरक सरळ सरळ दिसत होता. या तुझ्या फिरण्याला देखील नाव ठेवण्यात आलं. तुझ्यावर टिका टिप्पणी करण्यात आली. तू तसूभरही शांतता ढळू दिली नाही.

Devendra Fadanvis Banner, Sandip Joshi
Devendra Fadnavis: फडणवीस नाराजच? फेसबुक, ट्विटरवर अजूनही सर्वकाही जैसे थे!

१० तारखेला राज्यसभेचा निकाल लागला. म्हटल्याप्रमाणे तू भारतीय जनता पक्षाची एक जास्त जागा निवडून आणली आणि विरोधकांना धक्का दिलास. पवारांसारखा माणूस देखील हतबल झाला, त्यांनीदेखील तुझी स्तुती केली. जे १० तारखेला झालं तेच पुन्हा विधानपरिषदेत... २० तारखेला. विधानपरिषदेमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची एक जागा जास्तीची निवडून आली. ते बघून देखील सर्वांना धक्का बसला. संध्याकाळी, रात्री सर्वांसोबत होतास, मात्र महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भूकंप घडतोय याची तुला कल्पना असून देखील तू चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी यासाठी सुरू असलेल्या या धडपडीत तुझ्यावरचे संघाचे संस्कार दिसत होते. २१ जून पासून आजपर्यंत मागील पाच-सात दिवसात चेहऱ्यावरची शांतता ढळली नाही. संयम सुटला नाही. तू ज्या पद्धतीने काम करत होतास ते बघून निश्चितच आश्चर्य वाटतं. आम्हाला मात्र महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद होत होता की, पुन्हा एकदा आमचा लाडका देवेंद्र हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार.

पुन्हा एकदा अर्धवट पडलेली जलयुक्त शिवाराची योजना पूर्ण होणार… पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणामध्ये महाविकास आघाडीने घातलेला धिंगाणा तू मिटवणार… पुन्हा एकदा मराठा आरक्षण तू निश्चिंत करणार… पुन्हा एकदा वाझेसारखी चूक या महाराष्ट्रात घडणार नाही… पुन्हा एकदा तुझ्या रुपाने भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र होणार… ज्याची आम्ही वाट बघत होतो. आम्हाला आनंद होत होता, काल रात्री सरकार पडल्यानंतर… पण जाता जाता तुझ्यावर टोमणे मारले गेले. ते देखील आम्ही पाहत होतो. तू सुद्धा शांतपणे बघत होतास...

या सर्व काळामध्ये मागील अनेक वर्षांमध्ये तुझ्यासोबत राहत असताना अनेकांनी तुला शिव्यांची लाखोळी वाहिली. परंतु तुझ्या तोंडामध्ये त्या कार्यकर्त्याबद्दल, त्या नेत्याबद्दल कधी अप शब्दही बाहेर पडला नाही. अनेकदा निर्णय प्रक्रियेमध्ये तुझ्या मनाच्या विरुद्ध निर्णय झाला. मात्र तरी देखील त्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी तू केलेली पराकाष्टा, तू केलेले प्रयत्न, तू केलेली पैशांची तजवीज, हे देखील अत्यंत जवळून मी बघितलेलं आहे. मित्रा, आज जे घडलं ते बघून अक्षरशः: धक्का बसला. माझ्यासारखे हजारो, लाखो कार्यकर्ते जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांना प्रचंड धक्का बसला. स्वत:ला सहज मिळू शकणारी मुख्यमंत्र्याची खुर्ची तू दुसऱ्यासाठी पुढे केली. स्वत:ची मुख्यमंत्र्याची खुर्ची ज्याच्या पेक्षा तुझ्या अंगी पात्रता जास्त आहे अशा व्यक्तीसाठी तू स्वत:ची मुख्यमंत्री पदाची खुर्ची सहज सरकवली आणि हे असताना तुझ्या चेहऱ्यावर एक शिकंज देखील आम्ही बघितला नाही. मित्रा हे बळ कुठून आणलंस? म्हणूनच पार्टी विथ डिफरन्स भारतीय जनता पक्ष जर आज अनेक वर्ष टिकून आहे व तुझ्यासारख्यामुळेच वाढत आहे.

आम्हाला नेहमीच अभिमान आहे की आम्हाला तुझा कार्यकर्ता म्हटले जाते. आम्हाला नेहमीच अभिमान असणार आहे की आम्हाला तुझा मित्र म्हणून ओळखलं जातं. पण मित्रा, हे सारं करणं हे तू आणि फक्त तूच जाणे… तूच हे करू शकतो. दुसरा कुणीही हे करण्याची हिंमत देखील दाखवू शकणार नाही. याबद्दल मला खात्री आहे. मित्रा, या तुझ्या धैर्याबद्दल, या तुझ्या ‘पक्ष प्रथम, नंतर मी’ हे वास्तवात उतरवल्याबद्दल मनापासून तुला मानाचा मुजरा करतो.

आत्ताच पुन्हा दुसरा धक्का बसला ,की केंद्रीय नेतृत्वाने तुला विनंती करून तुझी नेमणूक महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी केली. निश्चितच तू पक्षाचा आदेश शंभर टक्के पाळणार याची जाणीव आहे. परंतु पाच वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर एका सहकाऱ्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं किती वेदनादायक असेल, पत्रकार परिषदेत मी मंत्रिमंडळाच्या बाहेर रहाणार हे घोषित केल्यावर पक्षश्रेष्ठींनी दिलेला आदेश पाळणे किती अवघड असेल हे समजणं कठीण आहे. परंतु केवळ आणि केवळ पक्षादेश म्हणून तू हे करणार आहेस नव्हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत येण्याकरिता तू जिवाचे रान करणार यांत कुठलाच संदेह नाही. म्हणूनच ह्या महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांचा तू प्रेरणास्थान व पॅावरस्टेशन आहेस.

म्हणूनच तुला दिल से सलाम !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com