Nitin raut, Milind mane, Manoj Sangole  Sarkarnama
विदर्भ

BSP News : उत्तर नागपूरमध्ये बसपाचा बदललेला उमेदवार कोणाला धक्का देणार?

North Nagpur BSP Candidate Change Impact: उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक चर्चा असते ती बसपाचा उमेदवार कोण याची. या मतदारसंघामध्ये बसपाचे प्राबल्य आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक चर्चा असते ती बसपाचा उमेदवार कोण याची. या मतदारसंघामध्ये बसपाचे प्राबल्य आहे. असे असले तरी आजवर एकही उमेदवार पक्षाचा निवडून आला नाही. मात्र, काँग्रेस उमेदवाराचे समीकरण बिघडवण्याची ताकद हत्तीत आहे. यावेळी येथून बसापच्या दोन उमेदवारांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यापैकी एक उमेदवार छाननीत बाद झाला आहे.

काँग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांना यावेळी उत्तर नागपूरमधून बसपाच्या हत्तीवर बसण्याचा मान मिळाला आहे. ते काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे विरोधक आहेत.

सांगोळे यांना ओळखत नाही असा माणूस उत्तर नागपूरमध्ये सापडणार नाही. त्यांचे वागणे आणि बोलणे विचित्र असले तर नगरसेवक म्हणून एकदम कामाचा अशी सांगोळे यांची ओळख आहे. एखादी नाली तुंबली तर मनापच्या सफाई कर्मचाऱ्याची वाट न बघता हा माणूस मेनहोलमध्ये उतरतो.

पाणीटंचाई असेल टँकरवर बसून तो घरोघरी जाऊन पाणी वाटप करतो. यावरून त्यांचे नेहमीच इतर नगरसेवक व महापालिकेच्या कर्मचांऱ्यासोबत वादही झाले आहेत. टँकर पळवल्याचेही आरोप त्यांच्यावर आहेत. याच कारणामुळे महापालिकेत ते यापूर्वी तीन वेळा निवडून आले आहेत. एकदा पराभवाचाही धक्का त्यांना बसला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे 10 नगरसेवक उत्तर नागपूरमधून निवडून आले होते. 2014 च्या निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये बसपाचे उमेदवार होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत झाली होती. काँग्रेसच्या नितीन राऊत यांना पराभवाचा धक्का बसला आहे. एवढेच नव्हे तर ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

बसपाचे गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. या निवडणुकीत भाजपचे डॉ. मिलिंद माने निवडून आले होते. यावरून बसापचे उत्तर नागपूरमधून महत्त्व अधोरेखित होते. आता पुन्हा नितीन राऊत (Nitin Raut) आणि भाजपचे मिलिंद माने यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, यावेळी गजभिये यांच्याऐवजी बसपाच्या हत्तीवर मनोज सांगोळे हे बसले आहेत. ते किती मतांपर्यंत मजल मारतात यावर राऊत आणि माने यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

विशेष म्हणजे बसपाने बुद्धम राऊत यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांचे नावही बसपाने जारी केलेल्या यादीत होते. बसपाच्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचे ठरवले होते. सर्वांना पक्षाचा एबी फॉर्मसुद्धा देण्यात आला होता. तत्पूर्वी एक दिवस आधीच मनोज सांगोळे यांनी काही वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून बसपाचा एबी फॉर्म मिळवला. तो त्यांनी लगेच उमेदवारी अर्जाला जोडून भरलासुद्धा होता.

पहिला अर्ज त्यांचा असल्याने बुद्धम राऊत यांचा अर्ज छाननीत बाद ठरवण्यात आला आहे. त्यामुळे बसपाचे अधिकृत उमेदवार म्हणून सांगोळे यांना हत्ती चिन्ह मिळणार आहे. हा नितीन राऊत यांच्यासाठी धक्का तर भाजपसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT