MLA Nilay Naik
MLA Nilay Naik Sarkarnama
विदर्भ

BJP Party Politics: विधानपरिषद आमदार निलय नाईकांना भाजप डच्चू देणार?

Jagdish Patil

MLA Nilay Naik On Legislative Council: लोकसभा निवडणुका संपताच आता राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. अशातच आता राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नाईक घरण्यातील आमदार निलय नाईक (MLA Nilay Naik) यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे नीलय नाईक यांना भाजपकडून पुन्हा विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार का? याबाबतच्या चर्चा यवतमाळ जिल्ह्यात सुरु आहेत.

एकेकाळी यवतमाळ जिल्ह्यात नाईकांचे वर्चस्व होते. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. शिवाय ते शरद पवारांच कट्टर समर्थक समजले जायचे. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) विदर्भात आपली ताकद निर्माण करण्यासाठी वसंतराव नाईकांकडे राज्याचं नेतृत्व सोपवले होते. याचा फायदादेखील काँग्रेसला झाला होता. शिवाय विदर्भ म्हणजे काँग्रेस असे समीकरणही तयार झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हरित क्रांतीचे जनक अशी वसंतरावांची ओळख होती. पवार दिल्लीत गेल्यानंतर वारसदार म्हणून त्यांनी वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचे पुत्र सुधाकरराव नाईकांच्या हातात राज्याची सूत्र दिली होती. या काळात पी.व्ही. नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान होते, तर पवारांकडे देशाचे संरक्षण खाते होते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होताच त्यांचे आणि पवारांचे काही कारणाने खटके उडायला लागले. याचाच फायदा पवारांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी घेतला.

याच काळात मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगली उसळल्या होत्या. त्यामुळे पवारांना दिल्लीतून महाराष्ट्रात पाठवलं गेलं आणि सुधाकरराव नाईकांना बाजूला सारलं गेलं. तेव्हापासून नाईक घरण्याचे राज्याच्या राजकारणातील वर्चस्व कमी होऊ लागलं. तर विदर्भात पक्ष वाढावा यासाठी भाजपने सुधाकरराव नाईक यांचे पुत्र निलय नाईक यांना विधानपरिषदेत पाठवलं. याचा यवतमाळ जिल्ह्यात पक्षाला मोठा फायदा होईल असं भाजपला वाटत होतं

उच्चशिक्षित असलेले नीलय हे मवाळ वृत्तीचे आहेत, मात्र ते लोकांमध्ये जास्त मिसळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला तरी ते आपले वलय जिल्ह्यात तयार करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपला त्यांच्या नावाचा किती प्रमाणात फायदा झाला हे सांगणं कठीण आहे. असं असताना आता पुन्हा विधानपरिषदेसाठी नाईकांचं नाव वर पाठवलं जाणार की त्यांना डच्चू दिला जाणार याबाबत भाजपमध्येच वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी निलय नाईक यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, हा मतदारंघ शिंदे गटाकडे गेल्यामुळे चर्चा पुढे सरकली नाही. त्यामुळे लोकसभा नाही निदान विधानपरिषदेसाठी तर भाजपकडून त्यांच्या नावाची शिफारस होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT