Winter Session
Winter Session Sarkarnama
विदर्भ

Winter Session 2022 : अधिवेशनाचा असाही विक्रम ; ६८४६ तारांकित प्रश्नांपैकी इतके प्रश्न स्वीकृत..

सरकारनामा ब्युरो

Winter Session 2022 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले.यंदाच्या अधिवेशनाच एकूण १२ दिवसापैकी १० दिवस काम चालले. एकूणच गेल्या दहा दिवसांतील कामावर लक्ष टाकले असता असे दिसते की, विरोधक-सत्ताधारी यांच्यातील ही राजकीय लढाई खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

या अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही, अशी चर्चा शिवसेना, आणि काँग्रेसमधील नेते दबक्या आवाजात करीत आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सामान्य जनतेसाठी कुठलाही मोठा निर्णय घेतला नसला तरी यंदाच्या अधिवेशनात विक्रमी कामकाज झाल्याचे दिसते.

कोरोनानंतर दोन वर्षांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले. यात अधिवेशनात विधानसभेत एकूण १० बैठका झाल्या. अधिवेशनाचे काम हे ८४ तास १० मिनिटे चालले. रोज सरासरी ८ तास २५ मिनिटे काम झाले.

हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्षवेधी, नियम ९७ च्या सूचना आल्या. एकूण ६८४६ तारांकित प्रश्नांपैकी ४२२ स्वीकृत करण्यात आले. तर ३६ ची उत्तरे देण्यात आली. एकूण २०२८ लक्षवेधी आल्या. त्यापैकी ३३३ स्वीकृत झाल्या आणि १०६ वर चर्चा झाली. या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारने काही चांगले निर्णय घेण्यात आले.

यापूर्वी कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात न होता, मुंबईत झाले होते. डिसेंबर २०२१च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या या अधिवेशनात एकूण ५१४४ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी २९९ स्वीकृत केले. सभागृहात ३२ प्रश्नांवर उत्तरे देण्यात आली. एकूण १०६५ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ५७ स्वीकारण्यात आल्या. तर २१ वर चर्चा झाली. नियम ९७ च्या १७ सूचना नाकारण्यात आल्या. नियम २९३ च्या २ सूचना प्राप्त झाल्या. पैकी १ वर चर्चा झाली.

लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. यामुळे मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी लोकायुक्तांच्या कक्षेत आले आहेत. मराठा उमेदवारांसाठी अधिसंख्य पदावर नियुक्ती देणार, ३० टक्के महिला आरक्षणाबाबत योग्य त्या सुधारणा करणार, गुरांवरील लम्पी रोगावर सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात लस येणार, ग्रामीण भागात शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत एसटी धावणार, अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याची विनंती फेटाळल्यास कर्नाटकविरोधात कोर्टात जाणार अशी इतर आश्वासने विधिमंडळात देण्यात आली. ही आश्वासने निवडणूक प्रचारातील नसून विधिमंडळातील असल्याने त्यांना विशेष महत्त्व आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT