Central Government Corporation Appointment Fraud : यवतमाळमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळांवर नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल 20 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या तिघा ठगांचा पर्दाफाश झाला आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघडकीस आला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
केंद्र सरकारकडून (Central Government) विविध महामंडळांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा दावा करत काही जणांनी नितीन भुतडा यांच्याशी संपर्क साधला. केंद्राच्या अखत्यारीतील 42 महामंडळांपैकी इच्छित महामंडळ निवडण्यासाठी तब्बल 20 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च येईल, तसेच एकूण रकमेपैकी 5 टक्के रक्कम टोकन म्हणून द्यावी लागेल, अशी ऑफर त्यांना देण्यात आली.
मात्र सुरुवातीपासूनच या व्यवहाराबाबत भाजपचे (BJP) नितीन भुतडा यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण संवादाचे गुप्त चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने त्यांनी स्टिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत स्थानिक पोलिसांनीही महत्त्वाची मदत केली.
ठगांना जाळ्यात ओढण्यासाठी नितीन भुतडा यांनी वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी एका बॅगेत रद्दी भरून वर 500 रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवले. वरकरणी बॅगेत मोठी रक्कम असल्याचा भास निर्माण करण्यात आला. ठरल्याप्रमाणे गणेश राठोड आणि विश्वजित राठोड हे दोघे संपर्क कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी टोकन रकमेची बॅग ताब्यात घेतली.
बॅग घेऊन दोघे निघताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या रॅकेटचा कथित सूत्रधार असलेल्या मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली. लौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजित सुरेश राठोड आणि गणेश लालसिंग राठोड (सर्व रा. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, लौकिक फुलकर याने 16 मे रोजी नितीन भुतडा यांच्याशी मेसेजद्वारे संपर्क साधला होता. त्याने केंद्र सरकारअंतर्गत असलेल्या 42 महामंडळांची यादी पाठवत त्यापैकी पसंतीचे महामंडळ निवडण्यास सांगितले. तसेच नियुक्तीची व्यवस्था करणारा व्यक्ती म्हणून गणेश राठोड याचे नाव आणि मोबाईल क्रमांकही पाठवण्यात आला होता.
यानंतर आरोपींनी नितीन भुतडा यांना तीन महामंडळांची नावे निवडण्यास सांगितले आणि नियुक्तीसाठी 20 कोटी 25 लाख रुपये खर्च येईल, अशी माहिती दिली. टोकन रक्कम दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर मंगळवार किंवा बुधवारी काम पूर्ण होईल, तसेच नियुक्तीबाबत थेट दिल्लीहून फोन येईल, अशी बतावणी करण्यात आली होती.
22 मे रोजी गणेश राठोड याने नितीन भुतडा यांच्यासोबत व्यवहाराबाबत चर्चा केली. त्यानंतर 23 मे रोजी विश्वजित राठोड हा भाजप कार्यालयात भेटला. अखेर 30 मे रोजी सकाळी माजी आमदार मदन येरावार यांच्या संपर्क कार्यालयात टोकन रक्कम स्वीकारण्यासाठी आरोपी पोहोचले असता पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केले.
या घटनेमुळे केंद्र सरकारच्या महामंडळांवरील नियुक्त्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, या रॅकेटमागे आणखी कोणी आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.