Yavatmal DCC Bank  Sarkarnama
विदर्भ

Yavatmal DCC Bank: यवतमाळ बँकेत एकनाथ शिंदेंची शिवसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Mahayuti News: महायुतीने काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयात खरी बाजी मारली ती शिंदेसेनेनं! सहकार क्षेत्रात दमदार प्रवेश करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महायुतीत आपलं वजन वाढवलं असून, पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाला या निकालाने बळ मिळाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal News: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिंदेसेनेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, ओबीसी गटात पालकमंत्री राठोड यांनी इंगोले साठी प्रतिष्ठा पणाला लावूनही त्याचा पराभव झाला. यामुळे गड आला पण सिंह गेला अशी म्हणण्याची वेळ शिंदे सेनेवर आली आहे.

महायुतीने काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत बँकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयात खरी बाजी मारली ती शिंदेसेनेनं! सहकार क्षेत्रात दमदार प्रवेश करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महायुतीत आपलं वजन वाढवलं असून, पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाला या निकालाने बळ मिळाले आहे.

भाजपसह महायुतीच्या मित्रपक्षांना सोबत घेत शिंदेसेनेने बँकेच्या सत्तेत मोठा वाटा मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली. त्यामुळे बँकेवर महायुतीची सत्ता आली. युतीत शिंदेसेना 6 जागा जिंकून मोठा भाऊ ठरला आहे. बँकेची निवडणूक महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरली होती. मात्र, निकालाने आघाडीला मोठा धक्का दिला.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल मानकर यांची उमेदवारी बाद झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यातच तालुका गटातून भाजपचे प्रवीण कोकाटे विजयी झाल्याने काँग्रेसच्या गोटातील अस्वस्थता वाढली. मानकर यांच्या उमेदवारीभोवती निर्माण झालेल्या घडामोडींनंतर आलेला हा निकाल काँग्रेससाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.

वणी तालुका गटातही निकालाने अनपेक्षित वळण घेतले. येथे अपक्ष कातकडे यांनी विजय मिळवत प्रस्थापित राजकीय समीकरणांना धक्का दिला. घाटंजी तालुका गटात भाजपला सलग दुसऱ्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या जागेच्या उमेदवारीवरून महायुतीत ओढाताण झाली होती.

अखेर भाजपला जागा सोडावी लागली, तर महाविकास आघाडीकडून डॉ. भुरे यांना उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे, माजी संचालक आशिष लोणकर यांच्यासाठीही ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. त्यामुळे घाटंजीचा निकाल हा केवळ एका जागेचा विजय-पराजय न राहता स्थानिक राजकीय वर्चस्वाची कसोटी ठरला.

पडद्यामागे राठोड विरुद्ध ठाकरे?

संपूर्ण निवडणुकीतील सर्वाधिक चुरशीची लढत ओबीसी गटात राहुल ठाकरे आणि सुशांत इंगोले यांच्यात झाली. अखेरच्या क्षणापर्यंत या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता होती. वरकरणी ही लढत ठाकरे विरुद्ध इंगोले अशी दिसत असली, तरी राजकीय वर्तुळात तिच्याकडे माणिकराव ठाकरे विरुद्ध पालकमंत्री संजय राठोड अशा प्रतिष्ठेच्या संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. सुशांत इंगोले यांच्या विजयासाठी संजय राठोड यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या गटात राहूल ठाकरे विजयी झाले.

सहकारात शिंदेसेनेची नवी खेळी

जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील काँग्रेसची सत्ता उलथवून महायुतीने सत्तेचा मार्ग मोकळा केला असला, तरी या निकालाचा राजकीय अर्थ त्यापलीकडे आहे. भाजप आणि अन्य मित्रपक्षांच्या साथीने शिंदेसेनेने सहकार क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्याची संधी साधली आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांच्यासाठी हा निकाल राजकीय बळ वाढवणारा ठरू शकतो. महायुतीचा झेंडा फडकला; पण या विजयात शिंदेसेनेचा वाढलेला प्रभाव हाच निकालाचा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT