Yavatmal DCC Bank .jpg Sarkarnama
विदर्भ

Yavatmal DCC Bank: काँग्रेसला चर्चेत गुंतवून शिवसेना मंत्र्याचा डबल गेम? भाजप, राष्ट्रवादीच्या मंत्री अन् आमदारांसोबतही खलबतं

DCC Bank Election: महायुतीतील जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नसतानाच शिवसेना आणि काँग्रेसमध्येही संभाव्य आघाडीच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal News: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. बँकेतील सत्तेची चावी आपल्या हातात ठेवण्यासाठी महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागा वाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. तीन पक्षांच्या नेत्यांच्या सलग बैठका होऊनही जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेसमध्येही संभाव्य आघाडीच्या दृष्टीने खलबते सुरू असल्याने 'मध्यवर्ती'च्या निवडणुकीत कोण कोणाच्या गळ्यात गळा घालणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शनिवारी (ता. ५) विश्राम भवन येथे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच खासदार संजय देशमुख उपस्थित होते. बँकेच्या मतदारसंघनिहाय जागा, इच्छुकांची संख्या आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्येक पक्षाकडून जागांवर दावा होत असल्याने अंतिम तोडगा निघू शकला नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

यानंतर रविवारी (ता. ६) धामणगाव मार्गावरील एका खासगी हॉटेलमध्ये पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही माजी संचालकांची बैठक झाली. त्यामुळे महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न किती गंभीर आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता चर्चेसाठी फारसा वेळ उरलेला नाही. सोमवार (ता. ७) पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करणे सुरु झाले असून त्यासाठी अवघे पाच दिवस मिळणार आहेत. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ वाढली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक संचालक आणि इच्छुकांनी तयारी केली आहे. मात्र, पक्षीय आघाडी आणि जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. आपल्या मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेससोबतही 'चर्चेच्या फेऱ्या'

महायुतीतील जागावाटपावर अद्याप एकमत झालेले नसतानाच शिवसेना आणि काँग्रेसमध्येही संभाव्य आघाडीच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय समीकरणांना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कोणता पक्ष किती जागांवर लढणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

घाटंजी, महागाव, कळंब जागेवरुन ओढाताण

महायुतीत जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. जागा वाटपावरुन ओढताण सुरु आहे. तालुकागटातील घाटंजी, महागाव तसेच कळंब या तीन जागांवरुन शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून एकमत होताना दिसत नाही. याशिवाय जिल्हागटातही काही मतदारसंघात एकापेक्षा जास्त नावे आली आहेत. असे असले तरी जास्त ओढताण घाटंजी, महागाव तसेच कळंब तालुकागटासाठी सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT