Manish Patil, Manikrao Thakre, Sanjay Deshmukh and Pratibha Dhanorkar. Sarkarnama
विदर्भ

Yavatmal District Bank : महाविकास आघाडीची सरशी, तर महायुतीच्या नेत्यांना चपराक; अध्यक्षपदी मनीष पाटील !

सतीश हरिश्चंद्र येटरे

Yavatmal Political News : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज (ता. २५) दुपारी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मनीष पाटील, तर महायुतीकडून राजुदास जाधव यांना रिंगणात उतरविण्यात आले होते. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील यांचा दणदणीत विजय झाला. (Mahavikas Aghadi candidate Manish Patil won in a resounding victory)

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आनंदाचे तर राजुदास जाधव यांचा पराभव झाल्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण बघायला मिळाले. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रा. टिकाराम कोंगरे यापूर्वी अध्यक्ष होते. मात्र, काही राजकीय घडामोडी घडून त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. ही बाब लक्षात येताच कोंगरे यांनी नामुष्की टाळत स्वतःच अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

तेव्हापासून बँक अध्यक्षांचे पद रिक्त होते. दरम्यान, आज दुपारी बँक अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते मनीष पाटील तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते राजुदास जाधव यांना रिंगणात उतरविण्यात आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मनीष पाटील यांनी तब्बल १५ मते घेत दणदणीत विजय मिळवला. याउलट राजुदास जाधव यांना सहा मतांवर समाधान मानावे लागले.

पाटील यांना विजयी घोषित करताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकच जल्लोष केला. याउलट जाधव यांचा पराभव झाल्याने महायुतीच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याच ताब्यात यावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची चढाओढ लागली होती. परिणामी ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रतिष्ठेची केली होती.

पालकमंत्री राठोड यांच्यासह येरावार, नाइकांना हादरा...

स्पष्ट बहुमत नसताना बँकेवर ताबा मिळविण्याचा महायुतीचा प्रयत्न होता. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आमदार मदन येरावार, आमदार इंद्रनिल नाईक यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. परिणामी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच बाजूंनी रणनीती आखली गेली होती.

मात्र, महाविकास आघाडीतील भक्कम एकजूट आणि दोन अपक्षांनी दिलेली साथ, यामुळे महायुतीचे काहीच चालले नाही. परिणामी १५ संचालकांनी मनीष पाटील यांच्या बाजूने मतांचा कौल देत त्यांना विजयी केले. मनीष पाटलांच्या विजयाने पालकमंत्री राठोड, आमदार येरावार, आमदार नाईक यांना जबरदस्त हादरा बसला आहे.

महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित...

आगामी काळात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांना सामोरे जाताना महाविकास असो अथवा महायुतीतील घटक पक्षांना मतभेद, मतभेद विसरून एकोपा ठेवणे गरजेचे आहे. आजची बँक अध्यक्षपदाची निवडणूक यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी रंगीत तालीम होती.

महाविकास आघाडीतील एकही संचालक न फुटल्याने त्यांना एकीचे सामर्थ्य कळले. नव्हेतर पुढील निवडणुकांसाठी आता महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT