
Yavatmal Ganeshotsav News : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून पीओपी मूर्तींच्या विक्रीला बंदी आहे. दरवर्षीच गणेशोत्सव तोंडावर येताच राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून पीओपी मूर्तींची विक्री खपवून घेतली जाणार नाही, अशा वलग्ना केल्या जातात. मात्र, 'नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे ‘नेमेचि येतो गणेशोत्सव’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. (Idols of POP will not be allowed to enter)
उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाईवर उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये टॅंकरच्या व्यवसायाला मोठा ऊत येतो. दरवर्षी पाणीटंचाईच्या उपाययोजना केल्याचा आव अधिकारी आणतात आणि प्रत्यक्षात करत काहीच नाहीत. कारण त्यांनाही माहिती असते की, जसजसे दिवस गेले की पाऊस येतो आणि मग हा विषय आपोआपच बंद होतो. तसेच काहीसे गणेश मूर्तींच्या बाबतीत झाले आहे.
पीओपीच्या मूर्ती दाखल होऊ दिल्या जाणार नाहीत, असे म्हणत गणेशोत्सवाच्या पूर्वी कडक बंदोबस्त, तपासण्या आदींचा देखावा केला जातो आणि गणेश चतुर्थी झाली की, सर्व काही ठीक होते. पण या वर्षी तसे झाले नाही, तर यवतमाळ येथील मूर्तिकार रस्त्यावर उतरले आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. यवतमाळसह संपूर्ण राज्यात पीओपी गणेश मूर्तींची प्रचंड विक्री झाली. परिणामी मूर्तिकारांची कोंडी झाली.
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने काही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात पीओपी मूर्तींच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत. असे असताना यंदा गणेशोत्सवात संपूर्ण राज्यात पीओपी मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. परिणामी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींची विक्री झाली नाही. त्याचाच उद्रेक आज यवतमाळात पाहायला मिळाला.
महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने जिल्हाध्यक्ष राकेश प्रजापती यांच्या नेतृत्वात येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शाडू आणि लाल मातीने तयार केलेल्या मूर्ती आणून ठेवल्या. प्रचंड मेहनत घेऊन तयार केलेल्या या मूर्तींची विक्री न झाल्याने या आंदोलनात सामील मूर्तिकारांनी शासन व प्रशासनाविरोधात नारेबाजी करीत प्रचंड रोष व्यक्त केला.
या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिस तेथे दाखल झाले. त्यांनी आंदोलक मूर्तिकारांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. या आंदोलनात कुंभार समाज महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर मोहबिया, जिल्हा उपाध्यक्ष सतीश ठाकरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. श्रीकांत पाडावार, जिल्हा संघटक माधव मेहर आदींसह स्थानिक मूर्तिकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आश्वासनानंतर आंदोलन मागे...
कुंभार समाजाच्या या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले. या वेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी त्यांच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. तसेच यापुढे पीओपी मूर्ती बाजारात विक्री होणार नाही, याची प्रशासन काळजी घेईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी समजूतदारपणे आंदोलन मागे घेतले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.