विदर्भ

Yavatmal News: काँग्रेसला मोठे खिंडार? शिंदेसेनेचे वाढणार प्रस्थ; ‘मध्यवर्ती’च्या निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग

Yavatmal News : दोन्ही तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून बहुतेक जण शिंदेसेनेच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सरकारनामा ब्युरो

यवतमाळ : जिल्ह्यात आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. घाटंजी, आर्णी तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून बहुतेक जण शिंदेसेनेच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात उघड दोन गट झाले होते. काम करणार्‍या पदाधिकार्‍यांना डावलल्या जात असल्याचा आरोप त्यावेळी झालेल्या दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या बैठकीत केला होता. यानंतर काही दिवसांतच जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवानंद पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या दोन धक्यातून काँग्रेस सावरत नाही तेच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा वसंत जिनींगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे, माजी नगरसेवक पंकज मुंदे यांच्या अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतरही पक्षातील गटबाजी कमी झालेली नाही. उलट पक्षातून डावलल्या जात असल्याचे पदाधिकारी उघडपणे सांगत आहे. यामुळे आता पुन्हा शिंदेसेना महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. काँग्रेसमधील घाटंजी, आर्णी तालुक्यातील मोठा गट शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

या घडामोडींनंतर आता घाटंजी व आर्णी तालुक्यातील काँग्रेसमधील असंतोष उफाळून येत असल्याची चर्चा आहे. पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी आगामी काळात शिंदेसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक संचालक, बाजार समितीतील काही पदाधिकारी तसेच काँग्रेसशी संबंधित प्रभावी कार्यकर्ते पक्ष बदलण्याच्या हालचाली करीत आहेत.

माजी अध्यक्षांच्या नावाची चर्चा?

विशेष म्हणजे एका माजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नावाची पक्ष प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमधील या संभाव्य घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आगामी काही दिवसांत आणखी काही पदाधिकारी पक्षांतर करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.

संपर्क प्रमुखांचा ‘संपर्क’

गेल्या काही काळात शिंदेसेनेत ‘इनकमिंग’ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्काचा महत्त्वाचा भाग असला तरी संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सोबत जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांनी केली. त्यांनी काँग्रेसमधील युवा आणि तळागाळात काम करणार्‍यांचा शोध घेतला. त्यांच्याशी संपर्क ठेवत विश्‍वास निर्माण केला. यामुळेच गेल्या काही काळापासून इतर पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक पक्ष प्रवेश शिंदे सेनेत होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT