

Bajrang Sonawane: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर आज सभागृहात चर्चा सुरु असताना त्यात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांच्या आजूबाजूला राष्ट्रवादीचे इतर खासदार उपस्थित असताना त्यांनी भाषण केलं, त्याला या खासदारांनी दादही दिली. त्यांचं भाषण सुरु असताना मध्येच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आवाज चढवला पण त्यांनाही सोनवणेंनी आपल्या 'दम'दार भाषणानं प्रत्युत्तर दिलं.
बजरंग सोनावणे बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलताना म्हणाले की, मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार आहे. पण या सभागृहात असा कोणताही पक्ष नसेल ज्यानं आपल्या पहिल्याच खासदाराला थेट लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली असेल पण मला माझ्या पक्षानं ती दिली. मी जेव्हा दोन वर्षांपूर्वी या सभागृहात मी आलो आजपर्यंत मी अनेक मुद्दे उपस्थित केले. यामध्ये जलजीवन मिशन असेल, पीकविम्यााचा प्रश्न असेल, बँक ठेवीदारांचा मुद्दा असेल तसंच माझ्या जिल्ह्यातील रेल्वेचा अपूर्ण राहिलेला मुद्दा तसंच राष्ट्रीय महामार्गाचा अपूर्ण राहिलेला मुद्दा यावर मी अध्यक्षांच्यावतीनं सरकरला यावर काम करण्याची मागणी केली होती. पण अध्यक्ष बिर्ला हे चांगले आहेत वैयक्तिकरित्या त्यांच्याशी माझं काहीही वितुष्ट नाही. पण जेव्हा मी बिर्ला यांच्यावर वैयक्तिक आरोप करत नाही तर त्यांच्या खुर्चीला विरोध करतो आहे.
दरम्यान, याचवेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आवाज चढवला तर बजरंग सोनवणे यांनी त्यांना मध्येच थांबवत म्हटलं की, आमचे श्रीकांतजी खूपच ओरडत आहेत पण तुमची ही तिसरी टर्म आहे माझी पहिलीच टर्म आहे पण तरीही मी बोलणार आहे. अशा प्रकारे ओरडून जेव्हा चर्चा केल्या जातात समोरच्याच ऐकूनच घेतलं जात नाही, त्याचाच परिणाम म्हणून या सभागृहात लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे.
या सभागृहात भाजपच्या नेत्यांचा मोठा इतिहास आहे. यामध्ये अटलजी, आडवाणीजी आणि माझ्या महाराष्ट्रातील माझ्या जिल्ह्यातील प्रमोद महाजन यांनी या संसदेत काम केलं आहे. पण विरोधक कधीही या लोकांबद्दल आक्षेपार्ह बोलत नाहीत. पण समोर बसलेल्या माझ्या सत्ताधारी मित्रांना माझी विनंती आहे की, ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाठी-काठी खाल्या त्या माजी पंतप्रधानांविरोधात अशा गोष्टी या सभागृहात बोलल्या गेल्यात की ते ऐकून माझे कान का फाटले नाहीत? असा एकही दिवस जात नाही की तुम्ही विरोधकांवर आरोप करत नाहीत. मी पहिल्यांदाच या सभागृहात आलो त्यापूर्वी मी विचार करायचो की आपल्या वरिष्ठ मंत्र्यांचा सन्मान केला गेला पाहिजे.
जर आम्ही चुकूनही अशा प्रकारे जर पंतप्रधान, गृहमंत्री किंवा संरक्षणमंत्र्यांविरोधात बोललो तर आम्हाला आमचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा ओरडा खावा लागला आहे. हे आमच्या पक्षाचे संस्कार आहेत. पण तुम्ही पन्नास वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींवर इथं बोलता, त्यात आणीबाणीचा एक मुद्दा आहे. अरे जेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता तेव्हा ही आणीबाणी लादली गेली होती, त्याला आता इतके वर्षे झालेत तरी तुम्ही त्यावर आजही कसे काय बोलता?
यावेळी तालिका अध्यक्षा संध्या राय यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सोनवणे यांनी त्यांना म्हटलं की, मॅडम माझ्या पक्षानं मला बोलण्यची संधी आणि वेळ दिली आहे. त्यामुळं मला आज तुम्ही बोलू द्या. मी जेव्हा पण बोलण्यासाठी उभा असतो तेव्हा तुम्हीच अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्या असता आणि मला कधीही बोलण्याची संधी देत नाहीत. ओम बिर्ला देखील असेच आहेत ते एखाद्या टेबल फॅन प्रमाणं आहेत. हा फॅन एकाच बाजूला वळलेला असतो त्याला थंड हवा लागत असते. त्याचप्रमाणं बिर्ला हे जेव्हा उजव्या बाजूकडं बघतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं तर डाव्या बाजूला पाहिल्यानंतर ते नो.. नो.. नो.. असंच बोलत असतात, विरोधकांना बोलूच देत नाहीत, तसंच आता तुम्ही देखील करत आहात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.