Uddhav Thackeray, Sanjay Deshmukh and Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Yavatmal-Washim Loksabha Election : देशमुखांच्या विरोधात शिंदे कुणाला मैदानात उतरवणार, उत्कंठा शिगेला; दोन संजय भिडणार?

Sanjay Rathod : 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता.

सरकारनामा ब्यूरो

Yavatmal-Washim Loksabha Election : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीचा फैसला अजूनही झालेला नाही. त्यांना उमेदवारी द्यायची असती, तर आतापर्यंत घोषणाही झाली असती, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदे सेनेच्या वाट्याला आला आहे. उद्धव ठाकरे गटाने येथून माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांना मैदानात उतरवले आहे. देशमुख यांच्या विरोधात शिंदे कुणाला मैदानात उतरवतात, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

शिवसेना, भाजप व पुन्हा शिवसेना असा प्रवास केलेल्या संजय देशमुख यांनी घरवापसी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मोठी संधी दिली आहे. संजय देशमुख हे शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून देशमुख यांना बळ देण्यात आले आहे. संजय देशमुख हे संजय राठोडांसोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, 1999 मधील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळविला होता. संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक मानले जातात.

संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होते. 2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होता. या निवडणुकीत तत्कालीन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होता. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मते मिळवली होती. येथे एकनाथ शिंदे यांनी संजय राठोडांना उमेदवारी दिल्यास ‘हाय व्होल्टेज’ लढत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे कोणाला देणार उमेदवारी?

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काहीच दिवस उरले असताना महायुतीकडून अद्यापही उमेदवाराचे नावही घोषित करण्यात आलेले नाही. भावना गवळी यांनी उमेदवारी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, अद्याप त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. गवळी यांच्या उमेदवारीवरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. त्यांना महायुतीत तिकीट देणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गवळी यांना उमेदवारी दिली नाही तरी महायुतीत यवतमाळ मतदारसंघ शिंदे सेनेच्या वाट्याला असल्याने येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाला उमेदवारी देणार आणि संजय देशमुख यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करीत उमेदवारांची यादी जाहीर केली. 17 जणांची नावे असलेली ही यादी आहे. मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा या वेळी करण्यात आली. यादीत महाविकास आघाडीमधील विदर्भाचे दोन मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळाले आहेत. यात बुलडाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. बुलडाणा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांना तर संजय देशमुख यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

नरेंद्र खेडेकर यांनाच संधी...

बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून अखेर नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे मैदानात उतरणार आहेत. नरेंद्र खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख होते. सध्या ते बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांच्या नावाला पसंती आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT