Tawde-Vinod
Tawde-Vinod Sarkarnama
महाराष्ट्र

तावडेंनी राऊतांना सांगितला पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त करण्याचा उपाय

सरकारनामा ब्युरो

पुणे : केंद्र सरकारने नुकताच पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel) अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काल पासून पेट्रोल ५ रुपयांनी आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिवाळीच्या तोंडावरच हा निर्णय आल्यामुळे 'दिवाळी गिफ्ट' मिळाले असल्याचे म्हंटले जावू लागले आहे.

पण सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये मात्र हा इंधन स्वस्ताईचा केवळ देखावा असल्याचे म्हणत केंद्राच्या निर्णयाचा उपहास करण्यात आला आहे. मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट' वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी वाजवत आहेत. पण खरंतर पोटनिवडणुकांमधील पराभवामुळेच केंद्र सरकारला हे 'शहाणपण' सुचलं आहे. सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्टच द्यायची होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही? पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली, अशीही टीका सामनामधून करण्यात आली आहे.

मात्र संजय राऊत आणि शिवसेनेच्या याच भुमिकेला आता भाजप नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोलचे दर ५ रुपये आणि डिझेलचे दर १० रुपयांनी कमी केले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारनेही व्हॅट कमी केला तर संजय राऊतांच्या मनात सामान्य माणसाला पेट्रोल-डिझेल स्वस्त मिळावं ही जी तळमळ आहे ती पुर्ण होऊ शकते. पण ते न करता नुसतं काही लिहिणार असतील तर त्यांनी लक्षात ठेवावं की आजचा कागद ही उद्याची रद्दी होत असते, असाही टोला तावडे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.

देशातील १२ ज्योतिर्लिंग आणि ८२ धार्मिक शक्तीपिठांवर आज विविध कार्यक्रम पार पडले यावेळी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, संजय बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विनोद तावडे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तावडे यांनी "नर सेवा हिच नारायण सेवा" असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराखंडमधील आजच्या कार्यक्रमाचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमातुन श्रीमद शंकराचार्य त्यांचे कार्य आणि त्यातुन सर्वधर्माचा आधार सामान्य माणसाच्या सेवेसाठी कसा आहे हे समजण्यास मदत होणार आहे. तसेच उत्तराखंड हि देवभूमी मानली जाते, त्यामुळे देवभुमीची चारधाम यात्रा लोकांना सहजपणे करता येईल अशी व्यवस्था करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आहे. यातुनच "नर सेवा हिच नारायण सेवा" करू शकतो असा आत्मविश्वास आजच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमातुन मिळाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हंटले आहे?

केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी या गोष्टीला 'दिवाळी गिफ्ट' वगैरे म्हणता येणार नाही. इंधनाचे दर खूप खाली घसरले आहेत असे नाही. त्यामुळे महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही. म्हणजे पेट्रोल–डिझेलवरील खर्च किंचित कमी होईल, पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला, असं अजिबात होणार नाही. मुळात केंद्राला जर खरंच 'दिवाळी गिफ्ट' द्यायचे होते तर मग सामान्य जनतेचा रिकामा झालेला खिसा कसा भरेल, विझलेल्या चुली कशा पेटतील याचा विचार करुन इंधन स्वस्त करायला हवे होते. मात्र तेवढी इच्छाशक्ती केंद्र सरकारने दाखविलेली नाही. 'दिले, पण हात आखडता ठेवून दिले' असेच या दरकपातीबाबत म्हणता येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT