Mumbai News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वीच ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात धक्का बसला आहे. कोकण विभागाचे अपील प्राधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी विशाखा राऊत यांचे अपील फेटाळत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा 20 ऑगस्ट 2026 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे.
या प्रकरणाचा संबंध नगरसेवक अपात्रतेशी असल्याने उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दादर शिवाजी पार्कवरील प्रभाग क्रमांक 191 मागासवर्गीय महिला प्रवर्गातून विशाखा राऊत निवडून आल्या होत्या. मात्र, शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांनी राऊत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पालघर समितीने अधिकार क्षेत्राचे कारण देत हे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवले.
उच्च न्यायालयाचा झटका
या निर्णयाविरोधात आणि महापालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या या झटक्यानंतर विशाखा राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले.
सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2026 रोजी विशाखा राऊत यांना अंशतः दिलासा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने कोंकण विभागीय आयुक्तांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणताही प्रभाव न ठेवता, विशाखा राऊत यांच्या अपिलावर गुणवत्तेच्या आधारावर स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, तोपर्यंत मुंबई महापालिकेतील त्यांची जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे विरोधी उमेदवार प्रिया सरवणकर यांचा थेट नगरसेवक होण्याचा मार्ग तूर्तास लांबणीवर पडला होता.
दरम्यान, बुधवारी कोकण विभागाचे अपील प्राधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी विशाखा राऊत यांचे अपील फेटाळत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा 20 ऑगस्ट 2026 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे आता विशाखा राऊत यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.