local body election results timing : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत असताना नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे मतमोजणी नेमकी किती वाजता सुरू होणार आणि आपल्या प्रभागाचा निकाल कधी कळणार? याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून मतदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र काही ठिकाणी निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियमभंग झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. विशेषतः काही नगरपरिषदांमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता थेट निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ही बाब नियमबाह्य ठरल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
या प्रकरणांवर अपील दाखल झाल्याने संबंधित ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. नियमानुसार 22 नोव्हेंबरपर्यंत निकाल लागणे अपेक्षित होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. परिणामी, राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्य पदांसाठी तसेच विविध ठिकाणच्या 143 रिक्त सदस्य पदांसाठी मतदानाची नवीन तारीख निश्चित करण्यात आली.
या सर्व जागांसाठी मतदान प्रक्रिया शनिवार, 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मतदानानंतर लगेचच पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतमोजणी. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सर्व संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाईल.
मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडेल. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
मतमोजणीच्या दिवशीच बहुतांश प्रभागांचे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर होताच संबंधित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीतील सत्तास्थिती आणि राजकीय चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होताच नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांचे लक्ष निकालाकडे लागून राहणार आहे.