Santosh Deshmukh News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड आणि बीड, जिल्ह्यातील त्याची दहशत या गोष्टींची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अशातच शुक्रवारी (7 मार्च) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक ट्विट केले. यात वाल्मिक कराड यालाच शिवराज बांगर नामक तरुणाने धमकी देऊन खंडणी वसूल केल्याचा हा एफआयआर होता.
कराडला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी बांगर विरोधात मागील वर्षी जानेवारी महिन्यातच गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानुसार माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात टाइप रायटरची नोकरी करणाऱ्या गणेश उगले याने ही फिर्याद दिली आहे. तो इतर कार्यालयीन कामही पाहतो. शिवराज बांगर हा 1 जानेवारी 2023 रोजी जगमित्र संपर्क कार्यालयात आला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शिवराज बांगर हा तरूण ऊस तोड कामगारांसाठी काम करत असल्याचे सांगितले जाते. पण मागील काही वर्षांपासून तो राजकारणातही सक्रिय आहे. 2023 च्या सुरुवातीला भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. पण सहा महिन्यातच बीआरएस ही भाजपची टीम बी असल्याचा आरोप करत राम राम केला. त्यानंतर राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली. अजित पवार यांच्या बंडानंतर तो शरद पवार यांच्यासोबत कायम राहिला.
मध्यंतरी शिवराज बांगर याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. शिवसेनेचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे यांच्यासोबत बोलतानाची ही क्लिप होती. यात मी पंकजा ताईंना जाणीवपूर्वक धोका दिला. 376 बूथ बजरंग बाप्पांच्या ताब्यात दिले. तसेच बजरंग बाप्पांना पैसाही पुरवला. यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्ये केल्याचा संवाद होता. मात्र बांगर यांनी या ऑडिओ क्लिपचे खंडण केले होते. त्यानंतर आता शिवराज बांगर पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बांगर याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं असल्याचा आरोप केला आहे. "शिवराज हा ऊसतोड कामगरांच्या हक्कासाठी लढतोय, भगवानगडाच्या पायथ्याला ऊसतोड कामगरांचा मेळावा घेतोय. वंजारी समाजातील हा पोरगा पुढे जड जाणार, वेगळे राजकीय अस्तित्व निर्माण करतोय, म्हणुन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड याने मागचे 5 वर्षे प्रचंड छळलंय.
"त्याचे वयोवृद्ध आई-वडील, पत्नी यांच्यावर आनेक खोटे गुन्हे दाखल केलेत. त्यापैकी हा खंडणीचा एक गुन्हा आहे. असे शेकडो वंजारी समाजातील तरुण यांनी कायद्याचा दुरुपयोग करून संपवलेत. यांच्यावर वेळ आली की समाजाचे पांघरून घ्यायचे आणि वेळ निघून गेली की, समाजातील तरूणांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचे हे यांचे समाज प्रेम. अशा समाजातील उद्ध्वस्त लोकांची यादी खूप मोठी आहे" असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.