Aaditya Thackeray letter  Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray letter : प्रदूषणाच्या धुरात मुंबई हरवली? आदित्य ठाकरेंचं आयुक्तांना सडेतोड पत्र, व्यक्त केली मोठी भीती

Aaditya Thackeray Writes to BMC Chief Over Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेत वाढत्या प्रदूषणावर बीएमसी महापालिकेने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai air pollution : मुंबई शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर भीषण पातळीवर पोहोचला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरातील सर्व खासगी बांधकामांना किमान एक आठवड्यासाठी तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

या संदर्भात त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं आहे. प्रदूषणामुळे मुंबई शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा स्थितीत कोणतीही गुंतवणूक किंवा पर्यटक मुंबईकडे आकर्षित होणार नाहीत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

मुंबईतील प्रदूषण, खारफुटी संरक्षण आणि सार्वजनिक मैदानांच्या दुरवस्थेबाबत अत्यंत गंभीर मुद्दे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.​ तीन दिवसांपासून मुंबई धुरक्याच्या विळख्यात अडकली आहे. यावर उपाय म्हणून आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक प्रभागानुसार बांधकामांचे वेळापत्रक निश्चित करण्याची विनंती केली आहे. प्रदूषण कमी होईपर्यंत बांधकाम हालचालींवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुंबई (Mumbai) क्लायमेट वीकमध्ये मोठे दावे करणाऱ्या सरकारने आता प्रकल्पांच्या नावाखाली 45 हजार खारफुटींची झाडे तोडण्याचा निर्णय घेणे दुर्दैवी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रकल्प भूमिगत करून किंवा लांब स्पॅन वापरून ही झाडे वाचवता येतील. चंद्रपूरमध्ये वृक्षारोपण करण्याचा प्रस्ताव हा केवळ दिखावा आहे, अशी टीका त्यांनी केली.

बँक गार्डन नैसर्गिकच राहू द्या!

​कुलाबा इथल्या ‘बँक गार्डन’ या मातीच्या मैदानावर सिमेंटचे जंगल उभारण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. हे मैदान नैसर्गिक स्वरूपातच राहावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

मैदानांचे लेखापरीक्षण

मुंबई शहरातील ज्या मैदानांचे ‘टर्फ’मध्ये रूपांतर करून सर्वसामान्यांचा प्रवेश नाकारला जात आहे, अशा सर्व संस्थांचे लेखापरीक्षण करावे. यातून मैदानांची सद्यस्थिती समोर येईल, अशी महत्त्वाची मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केली.

भूमिगत पार्किंगवर प्रश्नचिन्ह

महालक्ष्मी रेसकोर्सवर भूमिगत पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव केवळ कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आहे. कोस्टल रोडवर पार्किंगची सोय असताना करदात्यांचा पैसा कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न मुंबईकर सहन करणार नाहीत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी पत्रात दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT