Ajit Pawar-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Pawar Vs Shinde Group : मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांच्या निशाण्यावर दादा भुसे; ‘तसं बोलण्याची गरज नव्हती....’

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ठाण्यातील मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विषय उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा केली होती. त्याला आठवडा होण्याच्या आधीच दादांच्या निशाण्यावर शिंदे गटातील मंत्री दादा भुसे आले. कांदा खाण्यासंदर्भात दादा भुसे यांनी बोलण्याची गरज नव्हती, असे आम्ही त्यांना सांगण्यात येईल, असे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सांगून टाकले. (After the Chief Minister, Ajit Pawar is targeting Dada Bhuse)

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने ४० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. त्याबाबत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. तसेच, फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घातला. त्यानंतर केंद्राने २४१० रुपये दराने दोनशे क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी दादा भुसेंसंदर्भात भाष्य केले.

परवडत नसेल तर चार महिने कांदा खाऊ नका, असे विधान राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी केले होते. त्याच्या विधानाबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, दादा भुसे यांना तशी बोलण्याची गरज नव्हती, असे आम्ही सांगू. त्यामुळे अजित पवारांनी शिंदे गटाला पुन्हा निशाण्यावर घेतल्याचे दिसून येते.

गेल्या आठवड्यात एकाच रात्री ठाण्यातील एका रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचे सांगण्यात येते. ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे,’ अशी विचारणा त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णांचे मृत्यू कसे झाले. किती रुग्णांची परिस्थिती गंभीर होती, शेवटच्या क्षणी किती रुग्ण आले होते, याची माहिती दिली.

बैठकीत चर्चा भरकटण्याची आणि वाद होण्याची चिन्हे पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत वाद मिटविल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यानंतर आज पुन्हा एकदा अजितदादांनी एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्याला निशाण्यावर घेतल्याचे बोलले जात आहे.

कांद्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला खटाटोप तर दुसरीकडे अजित पवारांचा शिंदे गटाच्या मंत्र्यावर निशाण यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT