Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे. या प्रकरणी अजित पवारांविरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपा अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यावरुन एकच खळबळ उडाली असतानाच अजित पवारांनी मात्र या प्रकरणावर मिश्किल टिप्पणी केली आहे.
अजित पवार(Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अंजली दमानिया टि्वट, महाविकास आघाडीतील मतभेद यांसारख्या विविध मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी त्यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याच्या आरोपांवर देखील भाष्य केलं. पवार म्हणाले, कोणामुळे कोणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी आणि सरकारने संरक्षण द्यावं. जर त्याच्यात गंभीरता असेल तर स्टेनगनसहित त्याला संरक्षण द्यावं असंही पवार यावेळी म्हणाले.
पवार म्हणाले, मी कायदा सुव्यवस्था, संविधान पाळणारा माणूस आहे. माझ्याकडून धोका असण्याचं काही कारण नाही. राजकीय धोका असू शकतो पण फिजीकल धोका असू शकत नाही असा मिश्किल टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
काय आहे प्रकरण?
भाजप पदाधिकारी रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. साळगावकर पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे अध्यक्ष आहेत. साळगावकर यांच्याकडे गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉटचा ताबा आहे. तसेच या प्लॉटची मोजणी न करण्याचे आदेश न्यायालयाचे दिले आहे.
तरीदेखील या प्लॉटची मोजणी करण्यात येत होती. याचवेळी साळगावकर यांना सातत्यानं धमकी दिली जात होती. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून तपास सुरु करण्यात आला आहे. याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातही या प्लॉटच्या संदर्भात अजित पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावल्याचं साळगावकर यांनी म्हटलं आहे. तसेच तहसील कार्यालयातून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे रवींद्र साळगावकर यांनी अखेर अजित पवारांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.