Ambadas Danve News Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve News : दानवेंचे निलंबन मागे घेण्यासाठी जोरदार हालचाली; बैठकांचा धडाका,फडणवीसांचा पुढाकार; उद्या निर्णय होणार ?

Deepak Kulkarni

Mumbai News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सोमवारी (ता. 2) राडा झाला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी त्यांच्याकडे हात करुन बोलणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर मंगळवारी अंबादास दानवेंचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती. पण आता दानवेंचं निलंबन मागे किंवा त्याचे दिवस कमी केले जाण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेमध्ये शिवीगाळ प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. माझे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती करणारे पत्र त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिले आहे. यानंतर दानवे यांचं निलंबन मागे घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे. यासाठी सलग दोनवेळा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या दालनात बुधवारी (ता.3) बैठका पार पडल्या. एवढंच नाही तर स्वतः फडणवीस यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा ही केली. मात्र, आजच्या दिवसात तोडगा काही निघाला नाही. प्रसाद लाड यांनी खूप प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने माफीनाम्याशिवाय मार्ग निघणार नाही अशी भूमिकाच गटनेत्याच्या बैठकीत घेतली.

अंबादास दानवे यांनी माफीचे पत्र देखील लिहिले आहे. एवढेच नाही तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयाच्या अनुषंगाने माफी मागितली होती. तसेच कारवाई दानवे यांना आपली बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचा आरोप आमदार अनिल परब यांनी केला होता. अशा पद्धतीचे निवेदन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये केले.

अंबादास दानवे काय म्हणाले...?

सभागृहात झालेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करत आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही एक पाऊल मागे घेतले आहे. आपल्यावर झालेल्या निलंबनाचा फेरविचार व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सभागृहातील वर्तनाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्याकडून अनवाधानाने घडलेल्या घटनेमुळे मला निलंबित करण्यात आले. आमच्या पक्षप्रमुखांनीही जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता माझे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती दानवे यांनी पत्राद्वारे उपसभापतींकडे केली आहे.

त्यानंतर प्रश्न उत्तरे तास संपल्यावर नीलम गोऱ्हे यांच्या दालनात या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये निर्णय मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलून उद्या सभागृहामध्ये घोषण करू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT