Ambadas Danve :  Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve : "दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीसोबत पटेलांचे व्यवहार; आता फडणवीसांची भूमिका काय?"

Anand Surwase

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसत आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत असल्याचा स्पष्ट संदेश दिला. मात्र, मलिकांवर देशद्रोहाचा आरोप करणाऱ्या भाजपचा मलिक यांना महायुतीत सहभागी करण्याबाबत विरोध आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी 'देश प्रथम' म्हणत थेट अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना युतीत सहभागी करण्यास विरोध दर्शवला. यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून नवाब मलिकांबाबत जी तीव्र भावना व्यक्त केली, तीच भावना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या बाबतही आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झालेला असून, ते जामिनावर बाहेर असल्याचे सांगत भाजपने मलिक यांना अजित पवार गटाच्या माध्यमातून सत्तेत सहभागी करून घेण्यास विरोध केला. या प्रकरणावरून अजित पवार गटाला मलिक प्रकरणात नमती भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र दिसून आले. मात्र, दुसरीकडे मलिक यांना देशद्रोही म्हणून केलेल्या विरोधाचे स्वागत करताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दाऊदच्या हस्तकाशी व्यवहार असलेल्या पटेलांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात दानवेंनी म्हटले आहे की, 'विधानसभा सदस्य मलिक यांच्याबाबत आपण ज्या तीव्र भावना व्यक्त केल्या, त्या वाचून आनंद झाला. देशद्रोहाचे गुन्हे असल्याने त्यांना सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. यातून आपला राष्ट्रवाद किती पक्का आहे हे दिसनू आले. मात्र, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते (अजित पवार गटाचे) खासदार प्रफुल पटेल हे नुकतेच देशाच्या गृहमंत्र्यांना भेटले. यापूर्वीही ते गोंदिया विमानतळावर पंतप्रधान मोदींचीही भेट घेत त्यांचे स्वागत केले होते, परंतु याच पटेलांचे दाऊदचा हस्तक इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक व्यवहार आहेत.

या प्रकरणातून ईडीने पटेल यांची मुंबईतील मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता जशी 'तीव्र' भावना आपण नवाब मालिकांबद्दल व्यक्त केली, तीच भावना आपली खासदार प्रफुल पटेल यांच्याबाबतही आहे का? याचा खुलासा व्हायला हवा! अशी मागणी दानवे यांनी केली आहे. आता विरोधी पक्षनेते दानवे यांनी प्रफुल पटेल यांच्या सत्तेतील सहभागावर फडणवीस काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करण्यास विरोध केला. त्यासाठी त्यांनी त्यांच्यावर दाऊशी संबंधित आर्थिक व्यवहार केल्याच्या प्रकरणातून देशद्रोही म्हणून असलेल्या आरोपाचे कारण पुढे केले. फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राला उपमुख्यमंत्री अजित पवार 'मी माझ्या पद्धतीने उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मलिक यांची भूमिकाही समजून घेणार असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT