Maharashtra Assembly Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मलिकांना देशद्रोही ठरवलं होते. तेच मलिक आता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले आहेत, यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांना जाब विचारला.
"ज्यांच्यावर आपण आरोपांच्या फैरी झाडल्या, दाऊदशी व्यवहार केल्याचे सांगत जेलमध्ये पाठवले. आज तेच आपल्याला इतके प्रिय कसे झाले? की ते 'नवाबी थाटात' मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला 'आपले' वाटायला लागले आहेत? तुमच्या बाजूने बसले म्हणून ते आता 'ओके'आहेत, की हा तुमच्या भाजप वॉशिंग मशीनची कमाल आहे? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे.
आज (गुरुवार) विधिमंडळात जाण्याआधी नवाब मलिक हे अजित पवारांना भेटले, तर त्याआधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे समजते. मात्र, विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
फडणवीसांनी दाऊदशी संबंध असलेल्या मलिकांना देशद्रोही असे म्हटले होते. तेच मलिक आता त्यांच्या सत्तेत सहभागी झाले आहेत? यावरून फडणवीसांना विरोधकांनी घेरलं आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजेच विरोधात असताना फडणवीसांनी मलिकांवर टीका करत म्हटले होते की, डुकरासोबत कुस्ती करून घाण अंगाला लावून घ्यायची नाही, ज्यामुळे आता त्यावेळी फडणवीसांनी मलिकांवर केलेले आरोप खोटे होते का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
विधानसभेत आल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) नेमके कोणत्या बाकांवर बसतात, याबद्दल दोन्ही गटांमध्ये कमालीची उत्सुकता होती. ते कुठल्या बाकावर बसणार याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीतील दोन्हीही गट नवाब मलिक आपल्या गटात बसावे यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, मलिकांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले आहे.
विधिमंडळ परिसरात आल्यानंतर सर्वात आधी अजित पवार गटाचे नेते, मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. त्यानंतर अधिवेशनात ते सत्ताधाऱ्यांच्या मागील बाकावर बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.