Mumbai Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यातून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यातील शासकीय अस्थापनेत लावण्याचे आदेश जारी करा, अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. याचसंदर्भात त्यांनी ही मागणी केली आहे.
मनसे आणि महाराष्ट्र व मराठी यांचे एक वेगळच नातं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच मराठीसाठी लढताना दिसतात. तोच वारसा त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे पुढे चालवत आहेत. दरम्यान, “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा, अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता शाळा, कॉलेज, कार्यालयांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’चे सूर घुमणार आहेत.
‘महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयात हे आपलं ” राज्यगीत” लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा, अशी विनंती‘ अमित ठाकरे यांनी पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच- लावले जावेच हा आमचा आग्रह असल्याचे त्यांनी लिहिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनसेचे अमित ठाकरे पत्रातून लिहितात...
प्रति, श्री. एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
जे गीत ऐकताच महाराष्ट्रातील मराठी जनतेचा ऊर अभिमानाने भरून येतो, ज्या गाण्याने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात अशा “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…” या कै. गीतकार राजा बढे लिखित आणि कै. शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेल्या गीताला गेल्या वर्षी दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे ‘राज्य गीत’ असा दर्जा देण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अधिकृत शासकीय कार्यक्रमात या राज्य गीताचे गायन करणे किंवा ध्वनिमुद्रित स्वरूपात ते लावणे अपेक्षित आहे आणि ते गायले जावेच- लावले जावेच हा आमचा आग्रह आहे.
शासकीय परिपत्रकानुसार, राज्यातील प्रत्येक शाळेत आणि महाविद्यालयात अध्ययन वर्ग सुरू होण्यापूर्वी “जन गण मन अधिनायक जय हे…” या आपल्या राष्ट्रगीताचे गायन करणे अनिवार्य आहे. राष्ट्रगीताचा मान राखण्याबाबत शालेय स्तरापासून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर जाणीवपूर्वक संस्कार केले जातात, त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या राज्य गीताचे महत्त्व भावी पिढ्यांना- विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी आणि त्यांना आपल्या अत्यंत प्रेरणादायी राज्य गीताचा उचित सन्मान राखण्याची सवय लावण्यासाठी प्रत्येक शाळा तसंच महाविद्यालयात राज्य गीताचे गायन अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयांत प्रवेश करताच विद्यार्थी सहज वाचतील अशा ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या दर्शनी भागात एका मोठ्या फलकावर अथवा भिंतीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे संपूर्ण राज्य गीत लिहून त्याला कायमस्वरूपी ठळक प्रसिद्धी देण्याचे आदेश आपण सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावेत. त्याच प्रमाणे, बांद्यापासून चांद्यापर्यंतच्या प्रत्येक सरकारी कार्यालयाच्या दर्शनी भागातही आपले राज्य गीत लावण्यात यावे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या मागण्यांचा आपण गांभीर्याने विचार करावा, ही विनंती. उद्या 27 फेब्रुवारी. ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या पूर्वसंध्येला आपण याबाबतचा शासकीय आदेश काढला तर सर्वांना निश्चितच आनंद होईल.
धन्यवाद.
आपला नम्र, अमित ठाकरे अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.